मुंबई -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाचे पडसाद आता भारतातील वाहतूक आणि सेवा क्षेत्रातही उमटू लागले आहेत. आखातातील इराण-अमेरिका आणि इस्रायल संघर्षामुळे ऊर्जा पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाले असून एलपीजी गॅसच्या टंचाईचा परिणाम देशातील विविध क्षेत्रांवर दिसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेच्या खानपान सेवेलाही मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली असून रेल्वे स्थानकांवरील केटरिंग युनिट्स आणि स्टॉल चालकांसाठी आयआरसीटीसीने महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.
केंद्र सरकारने ५ मार्च रोजी व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅसवर काही निर्बंध लागू केल्याची अधिसूचना जारी केली होती. त्यानंतर अनेक भागांत गॅस सिलिंडर मिळण्यास विलंब होत असल्याने नागरिकांनी गॅस वितरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या परिस्थितीचा थेट परिणाम रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ विक्री केंद्रांवर होत असून स्टॉल चालकांना गॅस उपलब्ध होण्यात अडचणी येत असल्याचे समोर आले आहे.

या परिस्थितीचा विचार करून भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (IRCTC) केटरिंग ऑपरेटर्ससाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. संभाव्य एलपीजी कमतरतेचा परिणाम प्रवाशांच्या सेवांवर होऊ नये म्हणून स्टेशनवरील केटरिंग युनिट्सना मायक्रोवेव्ह ओव्हन, इंडक्शन कुकिंग यांसारख्या विद्युत उपकरणांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी रेडी-टू-ईट खाद्यपदार्थांचा पुरेसा साठा ठेवण्याचेही सांगण्यात आले आहे.
आयआरसीटीसीने स्पष्ट केले आहे की, या मार्गदर्शक सूचना ट्रेनमधील खानपान सेवांसाठी नसून रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्स आणि केटरिंग युनिट्ससाठी लागू आहेत. एलपीजीच्या उपलब्धतेत घट झाल्यामुळे स्टेशनवरील फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट रूम आणि ‘जन आहार’ आउटलेट्सना आपल्या कामकाजात काही बदल करावे लागणार आहेत. जर कोणत्याही केटरिंग युनिटमध्ये गॅसवर स्वयंपाक पूर्णपणे बंद करावा लागला, तर पर्यायी व्यवस्था करण्यासाठी संबंधित विभागाला तातडीने माहिती देणे बंधनकारक राहणार आहे.
दरम्यान, ट्रेनमधील पॅन्ट्री कारमध्ये प्रामुख्याने अन्न गरम करून प्रवाशांना दिले जाते आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव तेथे एलपीजी सिलिंडर ठेवले जात नाहीत. मात्र स्टेशनवरील बेस किचनमध्ये गॅसची कमतरता निर्माण झाल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी जेवण तयार करणे कठीण होत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे काही गाड्यांमध्ये शिजवलेल्या जेवणाची सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
याशिवाय, ज्या प्रवाशांनी रेल्वे तिकीट बुक करताना आधीच जेवणासाठी पैसे भरले आहेत, त्यांना परतफेड करण्याची योजना देखील विचाराधीन असल्याचे सांगितले जात आहे. प्रवाशांना सेवा पुरवताना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासन पर्यायी उपाययोजनांवर भर देत आहे.



