जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात एलपीजी गॅसचा गंभीर तुटवडा निर्माण झाल्याने रिक्षाचालकांचे अक्षरशः हाल होत आहेत. शहरातील दोन महत्त्वाचे गॅस पंप बंद असल्यामुळे उरलेल्या एकमेव पंपावर रिक्षांच्या किलोमीटर लांब रांगा लागल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. गॅस भरण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याने रिक्षाचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, त्यांच्या रोजीरोटीवरही संकट ओढवले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे. शहरातील दोन प्रमुख गॅस पंप बंद असल्याने रिक्षाचालकांना उपलब्ध असलेल्या एकमेव पंपावरच अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी, पंप परिसरात प्रचंड गर्दी होत असून रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दुपारपासूनच सुमारे १०० ते १५० रिक्षा रांगेत उभ्या असल्याचे चित्र पाहायला मिळाले, तर रात्री उशिरापर्यंतही चालकांना गॅससाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते.

रिक्षाचालकांनी सांगितले की, दिवसभर प्रवासी नेण्याऐवजी गॅससाठी रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांची रोजची कमाई थेट बुडत आहे. तासन्तास रांगेत उभे राहिल्यानंतरही गॅस मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने चालकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. काही ठिकाणी रांगेतील शिस्त बिघडल्यामुळे किरकोळ वादही झाल्याची माहिती मिळाली आहे.
रिक्षाचालकांच्या मते, एलपीजीचा पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही तर उद्यापासून अनेक रिक्षा रस्त्यावर उतरवणे कठीण होईल. रोजच्या कमाईवर घर चालवणाऱ्या चालकांसाठी ही परिस्थिती अत्यंत गंभीर ठरत आहे. गॅसअभावी रिक्षा बंद पडल्यास अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ शकते, अशी भीतीही चालकांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने लक्ष घालून एलपीजीचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. अन्यथा रिक्षाचालकांचा संताप आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



