Home Cities भुसावळ बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय पैशांची लूट; औष्णिक विद्यूत केंद्रातील प्रकार

बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय पैशांची लूट; औष्णिक विद्यूत केंद्रातील प्रकार


दीपनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील नवीन ६६० मेगावॅट प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ते वीज निर्मितीसाठी भेल प्रशासनाकडून महाजेनको प्रशासनाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. मात्र, या प्रकल्पाच्या कामात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काही कंत्राटदारांनी केला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे कंत्राट मिळवून शासनाच्या पैशांची लूट करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाचे काम मागील सहा वर्षांपासून महाजेनकोच्या अधिपत्याखाली भेल कंपनी करत आहे. प्रकल्पांमध्ये औद्योगिक सुरक्षेअंतर्गत कामे होण्यासाठी शैक्षणिकदृष्ट्या पात्र औद्योगिक सुरक्षा अधिकारी आणि औद्योगिक सुरक्षा पथक असणे अनिवार्य आहे. महाजेनको प्रशासनाने नवीन १X६६० मेगावॅट प्रकल्पामध्ये औद्योगिक सुरक्षा अधिकारी प्रकल्प सुरू होण्यापासून नियुक्त केलेला आहे. प्रकल्पातील काम करणाऱ्या कामगारांची संख्या लक्षात घेता आणि औद्योगिक सुरक्षा नियंत्रणात ठेवणे एका औद्योगिक सुरक्षा अधिकाऱ्यांकडून अशक्य असल्याने महाजेनको प्रशासनाकडून एका खाजगी कंत्राटदार संस्थेला शैक्षणिकदृष्ट्या पात्र सुरक्षा मदतनीस (सेफ्टी सार्जंट) पुरवण्याचा कंत्राट मागील पाच वर्षांपासून एकाच कंत्राटदाराला देण्यात आलेला आहे.

या कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांचे शैक्षणिक बनावट आणि औद्योगिक सुरक्षा नियमबाह्य कागदपत्रके सादर करून सदर कंत्राट मिळवल्याचा आरोप आहे. शासनाची दिशाभूल करून मागील पाच वर्षांपासून शासनाच्या पैशांची लूट करत असल्याचा आरोप संबंधित कंत्राटदारावर करण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका स्थानिक कंत्राटदाराकडून चार चाकी वाहन पुरवण्याच्या कंत्राटाच्या निविदेमध्ये चुकून जमा झालेल्या एका बनावट कागदपत्रामुळे सदर स्थानिक कंत्राटदाराला महाजेनको प्रशासनाने एका वर्षासाठी काळ्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे. स्थानिक आणि इतरत्र कंत्राटदारांमध्ये असा भेदभाव महाजेनको प्रशासनाकडून का? असा प्रश्न संबंधित स्थानिक कंत्राटदारांमध्ये उद्भवलेला आहे.

या पार्श्वभूमीवर, महाजेनको प्रशासनाने शासनाची आणि अधिकाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सुरक्षा मदतनीस पुरवित असलेल्या कंत्राटदाराला लवकरात लवकर काळ्या यादीमध्ये समाविष्ट करावे आणि सदर कंत्राटदाराच्या आजपर्यंतच्या कंत्राटी कामांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी इतर कंत्राटदारांनी केली आहे. तसेच, त्या कंत्राटदाराने आजपावेतो शासनाकडून लुबाडलेल्या रकमेची वसुली त्याच्याकडून लवकरात लवकर करण्यात यावी आणि त्याच्यावर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी चर्चा इतर कंत्राटदारांमध्ये सुरू आहे.

या संदर्भात लाईव्ह ट्रेंड्स न्यूजच्या प्रतिनिधींनी सदर कंत्राटदाराला दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती विचारली असता, त्यांनी अर्वाच्य भाषेत संभाषण करून माहिती देण्यास नकार देऊन महाजेनकोच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यास सांगितले. त्यामुळे या प्रकरणात मोठा आर्थिक घोटाळा असल्याची शक्यता नाकारता येत नाही.


Protected Content

Play sound