जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधि | लोण खुर्द, ता.अमळनेर येथील ग्राम पंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि एक महिला सदस्य यांनी शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणी, ग्रामपंचायत सदस्य पदावर राहण्यास अपात्रतेची कारवाई जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली आहे.
लोण खुर्द, ता अमळनेर येथील ग्राम पंचायतीचे सरपंच विकास अरविन्द पाटील,उपसरपंच बापू हिलाल पाटील, सदस्या साधना बापुराव पाटील यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी सरपंच, उपसरपंच सदस्य पदावरुन अपात्र करण्यात यावे, यासाठी सुका वना भील, समाधान गुलाबराव शिंदे, हंसराज श्रीकृष्ण पाटील, देवचंद सहादू भील या ग्रामस्थांनी ग्रा. प. अधिनियम १९५८ चे कलम १४ जे-३ प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात यांचेकडे विवाद अर्ज क्र-५८/०२१ नुसार तक्रार अर्ज दाखल केला होता.
त्या तक्रार अर्जावर चौकशी होऊन सरपंच विकास पाटील, उपसरपंच बापूराव पाटील, सदस्या साधना पाटील यांनी शासकीय जमिनीवर शासनाची कायदेशीर परवानगी न घेता बेकायदेशिर व अनधिकृत पणे भोगवटा सदरी नावे लावुन सदर जागा मिळकती लाभ घेत पदाचा दुरूपयोग केला असल्याचे देखील सिद्ध झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी राऊत यांनी लोण खु., चे ग्रा. प. सरपंच, उपसरपंच व सदस्य पदावरुन अपात्र घोषित असल्याचा निकाल दिला आहे.
तर, ग्राम पंचायत सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांनी, आम्ही स्वत: हुन अतिक्रमण केलेले नाही, अवैध फेरफार व रेकार्डवर खाडाखोड करून अतिक्रमणधारक दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा सामनेवाले यांचा बचाव देखील जिल्हाधिकारी यांनी सुनावणीनंतर फेटाळून लावला आहे. या निकालामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले असून अतिक्रमण धारकांना या निकालामुळे मोठी चपराक बसली आहे. तक्रारदारातर्फे अँड.विश्वासराव भोसले. पिपरखेडकर यांनी काम पहिले.