रावेर ( प्रतिनिधी) तालुक्यातील कर्जोद येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आरटीईच्या मानकानुसार शिक्षक नसल्याने आणि वारंवार मागणी करूनही शिक्षक दिले जात नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी वर्ग सुरू असताना शाळा बंद करून तिला कुलूप ठोकले. रिक्त जागांवरील शिक्षक हजर केले जात नाहीत, तोपर्यंत शाळा उघडू देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने गावात तणाव निर्माण झाला होता.
गेल्या वर्षापासून शाळेवर शिक्षकांची कमतरता आहे. या ठिकाणी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून, आरटीईच्या मानकानुसार १३४ विद्यार्थी संख्येनुसार येथे किमान ५ शिक्षकांची गरज आहे. परंतु येथे कायमस्वरूपी केवळ २ शिक्षक असून, एक शिक्षक प्रतिनियुक्तीवरील आहे. ही बाब पालकांनी अनेकदा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. या शाळेत सीनियर शिक्षिका अंजुम फारूखी या नेहमी रजेवर असतात, आजही त्या रजा ना टाकता गैरहजर होत्या. त्यांना याबाबत विचारले असता, ‘ मी वरिष्ठांना जवाब देईन ’, असे उत्तर त्यांनी दिले. इतर सोयी- सुविधांबरोबर शाळेला नवी इमारत मिळावी, शिक्षकांची रिक्त पदे भरली जावी, तसेच अन्य सुविधा ही उपलब्ध होत नसल्याने यास जबाबदार कोण ? रिक्त जागा भरण्यातही शिक्षण विभाग कुचराई करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
शाळेला ग्रामस्थांनी कुलूप लावल्याचे समजताच रावेरहुन शिक्षण विस्तार अधिकारी नईमोद्दीन, केंद्रप्रमुख कलीम, सय्यद इकबाल व नाजीर अली यांनी शाळेला भेट देऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पालकांनी त्यांचे काही ऐकून न घेता जोपर्यंत गटशिक्षण अधिकारी पवार हे कर्जोद शाळेत येणार नाहीत व या ठिकाणी असलेली शिक्षकांची कमतरता पूर्ण होणार नाही, तोपर्यंत कुलूप उघडणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यानंतर दुपारी ४.०० वाजता गटशिक्षणधिकारी पवार हे कर्जोदला पोहोचले व पालकांच्या समस्यांचे समाधान केले व कुलूप काढण्यास सांगितले. तसेच सतत गैरहजर व रजा न टाकता रजेवर जाणाऱ्या शिक्षिका अंजुम फारूखी यांना दंड करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. तरीही ग्रामस्थांनी त्या शिक्षिकेची बदली करण्याची मागणी केली व तसा प्रस्तावही तयार केला आहे.
या वादानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दोन शिक्षकांना प्रतिनियुक्तीवर देण्याचे आश्वासन दिले असून उरलेल्या जागांवरील शिक्षक लवकर भरण्यात येतील असेही आश्वासन दिले. त्यानंतर शाळेचे कुलूप उघडण्यात आले. यावेळी शरीफ शेख, पत्रकार शकील शेख, आरिफ शेख, आसिफ मेम्बर, अकील शेख, अल्ताफ शेख, बिस्मिल्ला शेख, आरिफ शेख, शकील खान, कलीम शेख, अकिल मिस्त्री, साजिद शेख, व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.