मुंबई प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रतिकारासाठी राज्यात लावण्यात आलेले कडक निर्बंध ३१ मे पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली असून याबाबतचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री करणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
राज्यात कोरोनाची रूग्णसंख्या वाढीस लागली असून मृत्यूचे प्रमाण देखील लक्षणीय असल्याने आरोग्य यंत्रणांवर ताण आलेला आहे. राज्य शासनाने लावलेल्या कडक निर्बंधांमुळे अलीकडच्या काही दिवसांमध्ये रूग्ण संख्येचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. हा कडक निर्बंधांचाच परिणाम असल्याने हे निर्बंध अजून १५ दिवस म्हणजे ३१ मे पर्यंत वाढवावेत अशी मागणी आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनेक मंत्र्यांनी केली. यामुळे लॉकडाऊन अजून १५ दिवस वाढणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कॅबिनेटच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना याचे सूतोवाचदेखील केले आहे.