भुसावळ- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या धाडसी कारवाईत चोरीस गेलेल्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे उचललेल्या या कारवाईमुळे जामनेर व भुसावळ परिसरातील वाहनचोरीच्या घटनांचा उलगडा झाला असून पोलिसांच्या दक्षतेमुळे गुन्हेगारांच्या हालचालींवर प्रभावी लगाम बसल्याचे दिसून येत आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पथकाने जामनेर परिसरातून अनुराग लक्ष्मण सूनगत (वय १९, रा. वाकी रोड, हरी ॐ नगर, जामनेर) आणि दर्शन बाप्पू चव्हाण (वय १८, रा. संत सेवालाल नगर, जामनेर) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या एका साथीदाराच्या मदतीने मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.

तपासादरम्यान जामनेर पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्हा रजि. नं. १८/२०२६ आणि ३८/२०२६ (BNS 303(2)) या गुन्ह्यांतील दोन मोटारसायकली तसेच भुसावळ शहर पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्हा रजि. नं. १७७/२०२४ (BNS 303(2)) मधील एक मोटारसायकल असा एकूण तीन दुचाकींचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला. जप्त केलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी जामनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, ग्रेड पोलिस उपनिरीक्षक रवी नरवाडे तसेच पथकातील इतर अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या पार पाडली. वाहनचोरीविरोधात पोलिसांनी घेतलेल्या या सक्रिय भूमिकेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.



