मुंबई वृत्तसंस्था । व्याज दरात कपात असो किंवा अन्य उपाय योजना; आमच्या भात्यातील बाण अजून संपले नाहीत, अशा शब्दात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भविष्यातील धोरणांचे संकेत दिले.
रिझर्व्ह बँकेने गेल्या दोन पतधोरकणात व्याजदरात १.१५ टक्के इतकी कपात केली आहे. भविष्यात व्याज दरात आणखी कपात करण्याचे संकेत देत दास यांनी अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठीच्या उपाय योजना इतक्यात मागे घेतली जाणार नाही असे स्पष्ट केले. सध्या रेपो दर चार टक्के आहे तर रिव्हर्स रेपो ३.३५ टक्के इतका आहे.
करोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेची होत असेली घसरण रोखण्यासाठी आणि पुन्हा रुळावर आणण्यासाठी काळजीपूर्वक पाउल उचलले पाहिजे. कोणत्याही पद्धतीने असे मानू नये की आरबीआय उपाय योजना लवकर मागे घेईल.
करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत एकदा स्पष्टता आल्यानंतर आरबीआय महागाई दर आणि आर्थिक विकास दरावर अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात करेल. एकूणच देशातील बँकिंग क्षेत्र मजबूत आणि स्थिर आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे एकिकरण हे योग्य पाउल आहे. बँका सध्या तणावाचा सामना करत आहेत, असे ते म्हणाले.