Home Cities अमळनेर Live ट्रेंड्स बातमीचा परिणाम : अखेर कळमसरे–शहापूर रस्त्यावर झळकले सूचना फलक 

Live ट्रेंड्स बातमीचा परिणाम : अखेर कळमसरे–शहापूर रस्त्यावर झळकले सूचना फलक 


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरे–शहापूर रस्त्यावरील कामामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीकडे Live ट्रेंड्सने लक्ष वेधल्यानंतर अखेर प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराकडून तत्काळ उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रस्त्यावर सुरू असलेल्या फरशी पुलांच्या कामामुळे वाहनचालकांना विशेषतः रात्रीच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागत होता, मात्र आता सूचना फलक लावण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे.

कळमसरे–शहापूर रस्त्यावर सध्या विविध ठिकाणी फरशी पुलांची कामे सुरू आहेत. या ठिकाणी खोदकाम झाल्याने आणि योग्य सूचना फलक नसल्याने अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली होती. याच मुद्द्यावर Live ट्रेंड्सने वृत्त प्रसारित करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या बातमीची दखल घेत संबंधित ठेकेदाराने तात्काळ पावले उचलत ज्या-ज्या ठिकाणी फरशी पुलांचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सहज नजरेस पडतील असे स्पष्ट सूचना फलक उभारले आहेत.

याशिवाय खड्डे आणि धोकादायक ठिकाणी विविध रंगांच्या रिबिनी लावण्यात आल्या असून, रात्रीच्या वेळीही वाहनचालकांना काम सुरू असल्याचा अंदाज येऊ लागला आहे. त्यामुळे यापूर्वी वाहनधारकांना भेडसावणारा नाहक त्रास आता कमी होणार असून संभाव्य अपघात टळण्यास मदत होणार आहे.

या रस्त्याच्या कामासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून सध्या रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. मात्र, योग्य नियोजन आणि सूचना अभावी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. Live ट्रेंड्सच्या बातमीनंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी आवश्यक त्या ठिकाणी सुस्पष्ट अक्षरातील सूचना फलक लावण्यात आल्याने माध्यमांच्या भूमिकेचे पुन्हा एकदा महत्त्व अधोरेखित झाले आहे.

या सकारात्मक बदलामुळे वाहनधारक, प्रवासी तसेच शेतकरी बांधवांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, वेळेवर दखल घेतल्याबद्दल संबंधित यंत्रणेसह Live ट्रेंड्सचेही आभार मानले जात आहेत.


Protected Content

Play sound