Home क्राईम लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या वृत्ताने पोलीस ॲक्शन मोडवर : गुटखा तस्करीचा डाव उधळला

लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या वृत्ताने पोलीस ॲक्शन मोडवर : गुटखा तस्करीचा डाव उधळला


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यात होणाऱ्या अवैध गुटखा तस्करीबाबत लाईव्ह ट्रेंडस न्यूजमधून वृत्त प्रकाशित होताच याची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने गुटखा तस्करी करणाऱ्याला वाहनासह अटक केली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, सध्या महाराष्ट्रात गुटखा बंदी असली तरी मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात सर्रास अवैध गुटखा विक्री सुरू आहे. मध्यंतरी पोलिसांनी यावर कारवाई केली असली तरी अलीकडच्या काळात याचा वेग मंदावला होता. यामुळे सर्वत्र खुलेआम गुटखा विक्री सुरू असून याची वाहतूक करणारी वाहने देखील सर्वत्र दिसून येत आहेत. काल सकाळी लाईव्ह ट्रेंडस न्यूजने याबाबत वृत्त प्रकाशित करताच खळबळ उडाली.

मुक्ताईनगर येथील पोलीस प्रशासनाने याची तात्काळ दखल घेतली. पोलीस निरिक्षक आशिष अडसूळ यांच्या निर्देशानुसार पोलीस पथकाने कारवाई करून पुरनाडा फाटा ते सुकळीच्या दरम्यान अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली. यात प्रतिबंधीत गुटखा आणि वाहनासह एकूण सहा लाख ४८ हजार ३६० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत अनिकेत शिवाजी सुरवसे (वय ३५, रा. सावरगाव, ता. बार्शी, जिल्हा सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते. डीवायएसपी अनिल बडगुजर आणि पोलीस निरिक्षक आशीष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय निलेश गोसावी, भाऊराव घेटे, असीम तडवी, प्रशांत चौधरी आणि जवाहर पवार यांच्या पथकाने केली.

मुक्ताईनगर पोलिसांनी केलेली ही कारवाई स्वागतार्ह असून आगामी काळात देखील अशाच प्रकारे सातत्याने अवैध गुटख्याच्या विक्रीला आळा घालावा अशी अपेक्षा आता व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound