जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील प्रत्येक पोलीस ठाणे निहाय सर्रासपणे सुरु असलेल्या अवैध धंद्यांसह त्यांच्या मालकांच्या नावाची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या यादीची माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी पोलीस महासंचालक नाशिक परिक्षेत्राचे आयजी यांच्याकडे शनिवार ३० मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता ऑनलाईन पद्धतीने तक्रार करीत कारवाईची मागणी केली आहे.
दीपक कुमार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव शहरात सर्रासपणे अवैध वाळू वाहतुक, सट्टा, मटका, पत्त्यांचे क्लब सुरु आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अवैधधंदे बिनबोभाट सुरु असल्याने कोणीही तक्रार करण्यास पुढे धजावत देखील नाही. शहरातील जिल्हापेठ, रामानंद नगर, एमआयडीसी, शनिपेठ व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यांसह त्यांच्या मालकांच्या नावाची यादी शनिवारी ३० मार्च रोजी दुपारी सोशल मीडियावर व्हायर झाली. ही यादी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी राज्याचे पोलीस महासंचालक व नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार केली असून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
काही वर्षापुर्वी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक गावठी हातभट्टीची दारु, अवैध वाळू वाहतुक व सट्टा व पत्त्यांचे क्लब सुरु होते. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अवैध धंद्यांसह ते चालविणाऱ्यांच्या यादीमध्ये तालुका पोलीस ठाण्याचा समावेश नाही. त्यामुळे या पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकही अवैध धंदा सुरु नाही का? असा सवाल उपस्थित होवू लागला असून ही आश्चर्याची बाब मानली जात आहे.
व्हायरल झालेल्या यादीमध्ये कुठल्या ठिकाणी कुठला अवैध धंदा सुरु असून त्याचा मालक कोण आहे हे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये सट्टा, जुगार, गुडगुडी याचा समावेश आहे. तसेच शहरातील अस्थापना सुरु ठेवण्यासाठी पोलिसांकडून रात्री दहा पर्यंतचे आहे. त्यानुसार रात्री दहानंतर सुरु असलेल्या अस्थापना चालकांवर कारवाई केली जाते, मात्र रात्री उशिरापर्यंत अवैध धंदे चालकांवर कुठल्याच प्रकारची कार्यवाही होत नसल्याने पोलिसांकडून दुजाभाव केला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.