मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील नगरपंचायतीने आज चौकात फलकाच्या माध्यमातून मोठ्या थकबाकीदारांची यादी चौकात फलकाच्या माध्यमातून लावली असून यात शहरातील अनेक धनाढ्य मंडळीचा समावेश असल्याने चर्चेला उधाण आले आहे.
मुक्ताईनगर नगरपंचायतीने आता थकबाकी वसूल करण्याची मोहिम तीव्र केली आहे. यात घरपट्टी थकबाकी ठेवणार्यांना आधी देखील सूचित करण्यात आले असले तरी बर्याच जणांनी अद्यापही वर्षानुवर्षे थकबाकी भरलेली नाही. यामुळे प्रशासनाने आता थेट शहरातील चौकांमध्ये फलकाच्या माध्यमातून या थकबाकीदारांची यादी जाहीर केली आहे. साधारणपणे पंचवीस हजार व त्यापेक्षा जास्त थकबाकी असणार्यांची नावे यातून दर्शविण्यात आलेली आहेत.
दरम्यान, या यादीत मुक्ताईनगरातील अनेक हाय-प्रोफाईल मंडळीचा समावेश असल्याचे दिसून आले आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मोठी मंडळी थकबाकीदार असल्याचे या फलकातून दर्शविण्यात आले असून यामुळे हे फलक पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत असून याबाबत सोशल मीडियात देखील मोठे चर्वण घडत असल्याचे दिसून आले आहे.
या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने नगरपंचायत प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी या शहरातील मोठ्या थकबाकीदारांची माहिती मुक्ताईनगरकरांना व्हावी यासाठी नव्हे तर त्या मंडळीला आपल्या जबाबदारीची जाणीव होऊन त्यांनी तातडीने थकबाकी भरावी यासाठी फलक लावण्यात आल्याचे सांगितले. आता देखील थकबाकी न भरल्यास पुढील कडक कार्यवाही करण्यात येईल असेही सांगण्यात आले.