भुसावळ (प्रतिनिधी) मुक्ताईनगर तालुक्यातील तरोडा येथे झालेल्या तीन वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणी आज (दि.१५) येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
सविस्तर माहिती अशी की, ज्ञानेश्वर पंडित खोडे याने ३ सप्टेंबर २०१५ रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास गावातील प्रमोद नीना पाटील यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. त्यांच्यात जुना वाद होता, त्यातून प्रमोद पाटील यांनी ज्ञानेश्वर व त्याच्या भावाविरुद्ध पोलिसात तक्रार दिली होती. ती मागे घेण्यासाठी ज्ञानेश्वर याने तगादा लावला होता. या वादाचे पर्यावसान खुनात झाले होते. मृत प्रमोद यांची पत्नी सविता पाटील यांनी त्यावेळी दिलेल्या फिर्यादीनुसार मुक्ताईनगर पो.स्टे.ला खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
या खटल्यात सरकारी पक्षाने आठ साक्षीदार तपासले. त्यानुसार गुन्हा सिद्ध होवून आरोपीस सक्तमजुरीची जन्मठेप व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.पी. डोरले यांनी सुनावली आहे. या खटल्यात सरकारतर्फे अॅड. विजय खडसे यांनी तर फिर्यादीतर्फे अॅड. अनिलकुमार वर्मा व अॅड. विजयालक्ष्मी मुत्याल यांनी काम पाहीले.