जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चरित्र्याचा संशयावरून पत्नी व मुलीला केटामाईन विषारी इंजेक्शन देवून त्यांचा खून करणाऱ्या सचिन गुमानसिंग जाधव याला जळगाव जिल्हा न्यायालयाने आजन्म सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, आरोपी सचिन जाधव हा आपल्या पत्नी कविता आणि मुलगी रिनाक्षी यांच्यासह जळगाव शहरातील रिंगरोड येथील एका हॉस्पिटलमध्ये वास्तव्याला होते. आरोपी हा पत्नी कविता यांच्यावर नेहमी चारित्र्याचा संशय घेऊन छळ करत होता. दरम्यान ५ मे २०१६ रोजी च्या मध्यरात्री त्याने पत्नी कविता आणि मुलगी मीनाक्षी हे दोघेजण गाढ झोपेत असतांना केटामाईन विषारी औषध इंजेक्शनद्वारे देऊन त्यांना जीवेठार केले होते. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तपासा अधिकारी सुप्रिया देशमुख, पोलीस निरीक्षक शाम तडवलकर आणि पोलीस उपनिरीक्षक कुबेर चौरे यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालया दाखल केले. हा खटला जळगाव जिल्हा न्यायालयातील न्यायमूर्ती जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. यामध्ये एकूण २४ जणांची साक्ष नोंदवण्यात आली. फिर्यादी तुषार राजपूत, डॉक्टर पाठक आणि महिलेच्या माहेरचे नातेवाईका यांची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यानुसार न्यायालयाने दोषी ठरवत संशयित आरोपी सचिन गुमानसिंग जाधव याला आजन्म सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोग्यता निलेश चौधरी यांनी काम पाहिले, त्यांना एडवोकेट हर्षल राजपूत, पैरवी अधिकारी चेतन ठाकरे यांनी सहकार्य केले.