अहमदाबाद वृत्तसंस्था । सध्या निलंबीत असणारे वादग्रस्त आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना आज न्यायालयाने कोठडीतील आरोपीच्या मृत्यू प्रकरणी जन्मठेप सुनावली आहे.
गुजरातमधील जामनगरमध्ये संजीव भट्ट हे पोलीस अधिक्षक असतांना एका बंददरम्यान हिंसाचार झाला होता. यात न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर एक आरोपी प्रभुदास माधवजी वैश्नानी यांचा मृत्यू झाला होता. संजीव भट्ट आणि त्याच्या सहकार्यांवर आरोपीला कोठडीत मारहाण करण्याचा आरोप करण्यात आला होता. संजीव भट्ट आणि इतरांविरोधात याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. गुजरात सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती. अखेर २०११ मध्ये राज्य सरकारने संजीव भट्ट याच्याविरोधात खटला चालवण्याची परवानगी दिली होती. यानंतर ऑगस्ट २०१५ मध्ये भट्ट यांना निलंबीत करण्यात आले होते. या खटल्याचा आज निकाल लागला असून यात संजीव भट्ट आणि त्यांचा सहकारी प्रवीण सिंग यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.