जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जळगाव शहरातील गोलाणी मार्केट येथे १० वर्षीय गतिमंद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला आज शनिवार, दि. १८ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, “जळगाव शहरात भिक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या १० वर्षीय गतिमंद अल्पवयीन मुलीवर सौरभ वासुदेव खर्डीकर (वय-२६) रा. राधाकृष्ण नगर जळगाव याने १० जुलै २०२२ रोजी दुपारी १२ वाजता शहरातील गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड केला आला होता.
या संदर्भात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा खटला जळगाव न्यायालयातील विशेष पोक्सो न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात चालवण्यात आला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे १६ साक्षीदार तपासण्यात आले. यात १० वर्षाच्या अल्पवयीन पीडित मुलीची साक्ष व रेखाचित्र काढणारे चित्रकार आणि वैद्यकीय अधिकारी तसेच सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाच्या ठरल्या. साक्षीपुराव्या अंती न्यायालयाने सौरभ खर्डीकर याला दोषी ठरवत विविध कलमान्वये मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आणि ७० हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी कामकाज पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून किरण पाटील व विजय पाटील यांनी सहकार्य केले.