धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील नांदेड आणि निमगव्हाण परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वाढलेल्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याचे अनेकांना दर्शन झाले असून, शेतकरी आणि शेतमजूर शेतात जाण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली आहेत. नुकतेच बिबट्याने दोन म्हशींच्या पारड्यांना ठार मारले असून, आता तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे.

सीसीटीव्ही फुटेजमुळे खळबळ
३ सप्टेंबरच्या रात्री बिबट्याने प्रल्हाद पांडुरंग पाटील यांच्या खळ्यातील दोन म्हशींच्या पारड्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारले. या घटनेने परिसरात दहशत पसरली होती. त्यानंतर, रविवारी, ७ सप्टेंबरच्या पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास हाच बिबट्या तापी नदीकाठी असलेल्या धुनीवाले दादाजी दरबाराच्या आवारातून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. या फुटेजमुळे बिबट्याचा वावर आता केवळ अफवा नसून, तो एक धोकादायक वास्तव बनल्याचे स्पष्ट झाले आहे. बिबट्याच्या हालचाली आता थेट वस्ती भागापर्यंत पोहोचल्यामुळे गावकऱ्यांची चिंता वाढली आहे.

वनविभागाकडे तातडीने उपाययोजनांची मागणी
या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ, शेतकरी आणि स्थानिक नेते यांनी वनविभागाकडे बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी योग्य ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा, तसेच परिसरात नियमित गस्त वाढवावी, अशी त्यांची आग्रही मागणी आहे. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ‘एकट्याने बाहेर फिरू नका, शेतात जाताना योग्य ती काळजी घ्या’, अशा सूचना देण्यात आल्या असून, वनविभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.



