मुंजलवाडीत शिवारात बिबट्याचा धुमाकूळ, गायीच्या वासराचा फडशा

रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील मुंजलवाडी शिवारात बिबट्याने गायीच्या ३ वर्षीय वासराचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे. मुंजलवाडी गावापासून १ किलोमीटर अंतरावर देवराम बळीराम पाटील यांच्या शेतात याकुब लालखा तडवी यांची गुरे चरत होती. २१ मार्च रोजी सकाळी ७ वाजता बिबट्याने अचानक गायीच्या वासरावर हल्ला केला आणि त्याला पकडून नेले.

गुरे राखणारे याकुब तडवी यांच्या लक्षात ही घटना येताच, त्यांनी बिबट्याचा पाठलाग केला. जवळपास अर्धा किलोमीटर पाठलाग केल्यानंतर त्यांना वासराला सोडवण्यात यश आले, पण बिबट्याने वासराचे मानेपासून दोन भाग केले होते. ही माहिती मुंजलवाडी गावात वाऱ्यासारखी पसरली.

मुंजलवाडीचे पोलीस पाटील राधेश्याम धनगर, सरपंच अशोक हिवराळे, अतुल पाटील, अय्युब तडवी, सोनू पाटील, सूरज हिवराळे यांनी घटनास्थळी पाहणी केली आणि वनविभागाला या घटनेची माहिती दिली. रावेर वन परिक्षेत्र अधिकारी अजय भवणे यांच्या सूचनेनुसार वनरक्षक ए. एच. पिंजारी आणि वनमजूर गुलाब बेग यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

गुरे राखणारे याकुब लालखा तडवी यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह गुरांवरच अवलंबून आहे. त्यांच्या झालेल्या २५ हजार रुपयांच्या नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वनरक्षकांनी शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी शेतात एकटे न जाता सामूहिक पद्धतीने जाण्याचे आवाहन केले आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Protected Content