भडगाव तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ : ग्रामस्थांची प्रशासनाकडे धाव

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वाडे, बहाळ व नावरे शिवारात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

 

या संदर्भातील वृत्त असे की, भडगाव तालुक्यांतील वाडे, बहाळ तसेच नावरे  शेतशिवारात मागील सहा महिन्यांपासुन बिबट्याचा वावर आहे. त्या बिबट्याने आता पर्यंत ८ ते ९ वासरांचा फडशा पाडला असून यामुळे शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

 

अलीकडेच दि.१० रोजी वाडे गावातील शेतकरी प्रभाकर विठ्ठल पाटील यांच्याही शेतात तारेच कुंपण तोडून बिबट्याने वासरीचा फडशा पाडला आहे. अशीच घटना ८ दिवसांपूर्वी विकास नारायण पाटील यांच्या शेतात ही घडली होती. अशा घटना वारंवार  घडत असून वन विभाग काहीच करताना दिसत नाही. आधीच पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत त्यात पशुधनाची अशी हानी होत असेल तर शेतकर्‍यांनी जगावं कस हा प्रश्न उभा राहतो. आज मुक्या जनावरांवर हल्ला होतोय उद्या उठून माणसांवर हल्ला झाला तर याला जबाबदार कोण असेल ? असा प्रश्‍न विचारण्यात येत आहे.

 

दरम्यान, वन विभागाने तत्काळ या घटनांची दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा असे आदेश वनविभागाला द्यावे अन्यथा उपोषणाची परवानगी द्यावी,अशा मागणी संदर्भाचे निवेदन शेतकरी संघटनेचे अखिलेश पाटील, अक्षय पाटील, भाऊसाहेब माळी, कुलदीप पाटील व आदी शेतकर्‍यांनी  भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे यांना दिले आहे.

Protected Content