सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाल येथून सावदा येथे परत येत असतांना आज रात्री माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे आणि त्यांच्या मित्रांना बिबट्याचे दर्शन झाले आहे.
सातपुडा पर्वतात अनेक हिंस्त्र प्राण्यांचा अधिवास असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. यात प्रामुख्याने बिबट्या आणि पट्टेदार वाघाचा समावेश आहे. यातील वाघ हा मुक्ताईनगर तालुक्यातील डोलरखेडा परिसरात प्रामुख्याने अनेकदा आढळून आला आहे. तर बिबट्या हा बर्याच ठिकाणी आढळतो.
सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे हे आपल्या मित्रांसह पाल येथे गेले होते. त्यांच्या सोबत फैजपुरचे माजी नगरसेवक शेख कुर्बान, नायरा पंपाचे संचालक शेख हमीद, प्लांटो इरिगेशन कंपनीचे संचालक भूपेंद्र सोनवणे, निंभोरा येथील केळीचे व्यापारी अमजदभाई आदी मित्र होते. तेथून परत येत असतांना रात्री साडेसातच्या सुमारास त्यांना बिबट्या दिसला. बिबट्याचा हा बछडा असून तो निवांतपणे रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडीत असल्याचे त्यांना दिसून आले. याप्रसंगी भूपेंद्र सोनवणे यांनी त्याचा व्हिडीओ देखील चित्रीत केला आहे.
या संदर्भात राजेश वानखेडे यांनी वन खात्यासह पोलीस प्रशासनाला याची माहिती दिली आहे. तसेच या भागात जातांना नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.