पाचोरा प्रतिनिधी | लग्नाच्या बंधनात बांधले जाण्यापूर्वीच आधारचं छत्र हरपल्याने त्या स्मृतींना चिरंतन जपण्यासाठी बापाचा पुतळा बनवून लेकीने लग्नात आशीर्वाद घेतल्याची घटना सारोळा रस्त्यावर असलेल्या ‘समर्थ लोंन’मधील विवाह समारंभात घडली आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील नांद्रा या गावातील माजी सैनिक व प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या भागवत पाटील यांना चार कन्यारत्न प्राप्त झाले. मुलगा मुलगी असा भेद न मानणारे पाटील यांनी आपल्या मुली म्हणजे कुळाला प्रकाशमान करणाऱ्या ज्योतीच आहेत असे मानले. मुलींना काय हवं, नको या गोष्टीकडे लक्ष देत त्यांना कुठल्याच गोष्टींची कमतरता भासू दिली नाही. “चारी मुलींचे सुयोग्य ठिकाणी लग्न लावून दिले की मी जबाबदारीतून मोकळा झालो” असे ते मुलींना नेहमी सांगत.
त्यांच्या दोन्ही मुलींचे लग्न झाले होते. थाटामाटात तिसरी लेक प्रियांकाच्या लग्नाची तयारी सुरु असतांना कुटूंबावर आघात झाला आणि भागवत पाटील यांचे अनपेक्षितरित्या कोरोनाकाळात निधन झाले. “चारी मुलींची लग्न लावण्यापूर्वी त्यांना या हे जग सोडून जावं लागलं. पण ते आमच्यासोबत आमच्या कुटूंबात आजही आहेत” या भावनेने व त्यांची स्मृती कायम सोबत राहावी या उद्देश्यातून त्यांचा पुतळा बनवून विवाहप्रसंगी वधूसह सर्व मुलींनी आशीर्वाद घेतले.
पाचोरा येथील सारोळा रस्त्यावर असलेल्या ‘समर्थ लोंन’मध्ये प्रियंका यांचा विवाह राहुल पाटील यांच्याशी नुकताच संपन्न झाला. यात भागवत पाटील यांच्या स्मृती जिवंत ठेवण्याच्या अनुषंगाने पुतळ्यास लग्न मंडपात आणण्यात आले तेव्हा उपस्थित साऱ्यांच्या नजरा त्यावर खिळल्या. ‘पप्पा’ म्हणत डबडबल्या डोळ्यांनी आपल्या लग्नात वडिलांचा आशीर्वाद घेणाऱ्या वधू प्रियंकाच्या भावंना पाहून उपस्थित वऱ्हाडी मंडळींचेही डोळे पाणावले.