मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी जाहीर झालेली पोटनिवडणूक बिनविरोध होणार आहे. सहा अर्जांपैकी एक अर्ज बाद झाल्याने आता पाच जागांसाठी केवळ पाच उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरवलेला अर्ज अपक्ष उमेदवाराचा होता. या अर्जासोबत १० आमदारांचे सूचक आणि १० आमदारांचे अनुमोदक म्हणून सह्या नव्हत्या, तसेच नोटरीही नसल्याने तो अपात्र ठरला.
या पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले उमेदवार आहेत: दादाराव केचे, संजय केणेकर, संदीप जोशी, चंद्रकांत रघुवंशी आणि संजय खोडके. दरम्यान, उमेदवारांना २० मार्च २०२५ पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर निवडणूक अधिकारी अधिकृत घोषणा करतील.
यापूर्वी १६ मार्च रोजी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली होती. यामध्ये नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी, माजी आमदार दादाराव केचे आणि प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांचा समावेश आहे. संदीप जोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात, तर संजय केणेकर यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षाचे महामंत्री म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दादाराव केचे यांना यापूर्वी विधानसभेचे तिकीट नाकारण्यात आले होते, परंतु आता त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागली आहे.
शिंदे गटाच्या शिवसेनेने चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी दिली आहे, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने संजय खोडके यांच्या नावाची घोषणा केली. संजय खोडके हे आमदार सुलभा खोडके यांचे पती असून, अजित पवार यांचे जवळचे सहकारी आहेत. या पोटनिवडणुकीत भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी एक जागा लढवत आहेत.
भाजपच्या तिन्ही उमेदवारांची आमदारकीची मुदत मे २०२६ पर्यंत आहे. राष्ट्रवादीचे संजय खोडके यांची मुदत २०३० पर्यंत, तर शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांची मुदत २०२८ पर्यंत राहणार आहे. निवडणूक प्रक्रियेत सहा अर्ज दाखल झाले होते, परंतु अपक्ष उमेदवाराचा अर्ज अपात्र ठरल्याने आता कोणतीही चुरस राहिली नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २० मार्चनंतर निवडणूक अधिकारी याची अधिकृत घोषणा करतील.