Home मनोरंजन धनाजी नाना महाविद्यालयात ‘जीवनलक्षी गीता’वर व्याख्यानमाला उत्साहात

धनाजी नाना महाविद्यालयात ‘जीवनलक्षी गीता’वर व्याख्यानमाला उत्साहात


सावदा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वर्गीय कुसुमताई मधुकरराव चौधरी यांच्या जयंतीनिमित्त धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे वैचारिक आणि आध्यात्मिक वातावरणात “जीवनलक्षी गीता” या विषयावर विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. नाशिक येथील स्वाध्याय परिवाराचे ज्येष्ठ वक्ते संजय जोशी यांनी या व्याख्यानातून गीतेचा जीवनाशी असलेला सखोल संबंध उलगडून सांगत उपस्थितांना आत्मपरीक्षणाची दिशा दिली.

दि. १७ जानेवारी रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. राजेंद्र वाघुळदे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. कुसुमताई मधुकरराव चौधरी व लोकसेवक मधुकरराव धनाजी चौधरी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठी विभागाच्या वतीने स्व. कुसुमताई यांच्या जीवनकार्याचा आढावा सादर करण्यात आला.

मराठी विभागातील प्रा. डॉ. शरद बिऱ्हाडे यांनी आपल्या प्रास्ताविकेत स्व. कुसुमताई मधुकरराव चौधरी या केवळ सामाजिक कार्यकर्त्या नव्हत्या, तर त्या मराठी साहित्याच्या उत्कृष्ट लेखिका व प्रख्यात कवयित्री असल्याचे नमूद केले. ‘कमलगंध’ व ‘मधुगंध’ हे त्यांचे काव्यसंग्रह तसेच बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांवरील संशोधनात्मक लेखन यामुळे त्यांनी मराठी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या प्रभावी व्याख्यानात संजय जोशी यांनी गीतेचा संदेश मानवजातीपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध संत-महापुरुषांनी केलेल्या प्रयत्नांचा संदर्भ दिला. भारताला लाभलेल्या संतपरंपरेने मानवकल्याणासाठी केलेले कार्य, जीवन जगण्यासाठी गीता कशी मार्गदर्शक ठरते, यावर त्यांनी सखोल भाष्य केले. गीता ही केवळ देवळात ठेवून पूजेसाठी नसून, ती वाचून, समजून तिचा आशय प्रत्यक्ष जीवनात उतरवण्यासाठी आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

गीता ही केवळ हिंदू धर्मापुरती मर्यादित नसून, सर्व मानवजातीच्या कल्याणासाठीचा सार्वत्रिक ग्रंथ असल्याचे प्रतिपादन करताना संजय जोशी यांनी “दिसते तेच खरे मानणारा माणूस कितीही मोठा असला तरी तो पशुवत आहे, तर मिळालेल्या शक्तीचा उपयोग संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी करणारा खरा माणूस आहे,” असे विचार मांडले. त्यांच्या या विचारांनी उपस्थितांमध्ये आत्मचिंतनाची भावना निर्माण केली.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी गीतेचे जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. विशेषतः तरुण पिढीसाठी गीता ही प्रेरणादायी मार्गदर्शक ग्रंथ असून, प्रत्येकाने तिचे तत्त्वज्ञान आचरणात आणावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमास व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. डॉ. मनोहर सुरवाडे, प्रा. डॉ. कल्पना पाटील, सौ. हेमलताताई चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. स्वाती महाजन यांनी मानले. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मराठी विभागातील प्रा. विजय तायडे, प्रा. पंकज बोदडे, प्रा. उन्नती चौधरी आणि प्रा. सिमा चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound