एरंडोल (प्रतिनिधी) येथील गांधीपुरा भागातील रहिवाशी सौ. लक्ष्मी राहुल चौधरी यांनी नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सौ.लक्ष्मी यांचे माहेर पहूर येथील असुन त्या सुरेश दामु करंकाळ यांच्या कन्या आहेत. सुरेश व त्यांची पत्नी तथा मुलगा पहूर येथे मठ विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांना पाच मुली असुन लक्ष्मी त्यांची लहान मुलगी आहे. लक्ष्मीचे पती राहुल हे एरंडोल येथील गांधीपुरा भागातील रहिवाशी असुन ते सध्या सिक्कीम येथे सिप्ला या औषधीच्या कंपनीत ज्यु.ऑफिसर पदावर कार्यरत आहेत. लहानपणीच राहुल यांच्या आई-वडीलांचे निधन झाले असुन त्यांचा सांभाळ काका अमृत चौधरी व तेली समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते प्रताप चौधरी यांनी केला. यातच एक वर्षापुर्वी राहुल व लक्ष्मी यांचा विवाह झाला. लक्ष्मी यांचे शिक्षण बी.ए., डी.एड. झालेले असुन त्या गेल्या तीन वर्षांपासुन जळगाव येथील ‘दीपस्तंभ’ या स्पर्धा परीक्षा केंद्रात प्रशिक्षण घेत होत्या. सन २०१७ मध्ये घेण्यात आलेली लोकसेवा आयोगाची परीक्षा त्यांनी दिली होती. या परीक्षेचा निकाल काल दि. ८ मार्च महिला दिनी लागला आणि त्यात त्या पास झाल्या आहेत.
लाईव्ह ट्रेंड्स न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलतांना लक्ष्मी यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, पती, गुरु, चुलत सासू-सासरे, बहीण नीता चौधरी व मेहुणे कैलास चौधरी यांना दिले. लक्ष्मी म्हणाल्या की, लग्नाआधी माझ्या आई वडिलांनी मला खुप कष्ट करून शिकवले मला आधीपासूनच या क्षेत्राची आवड होती. लग्नानंतर माझे पती राहुल व सासू-सासरे यांनी सुद्धा मला प्रोत्साहन देत शिक्षण सुरु ठेवले. मला या परीक्षेत यश प्राप्त झाले याचा मला खुप आनंद आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले. लक्ष्मी यांचे समाजातील मान्यवरांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पहा : आपल्या यशाबद्दल लक्ष्मी चौधरी काय म्हणत आहेत ते…!