यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सावखेडासिम ग्रामपंचायतमधील २०२० ते २०२२ कालावधीत १५व्या वित्त आयोग निधीत अपहार संदर्भात ग्रामनिधी व पाणीपुरवठा निधी अंतर्गत बँकेत पैसे जमा न करता परस्पर खर्ची झाल्याबाबत आ. शिरीष चौधरी व पं.स. गटनेते शेखर पाटील यांनी तक्रारीनंतर गटविकास अधिकारी यांनी कारवाई केलेली नाही. यामुळे गटविकास अधिकाऱ्यांना चार दिवसांच्या आत कारणे दाखवा नोटीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांनी काढले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील सावखेडासिम येथील ग्रामपंचायत मधील सन २०२० ते २०२२ या कालावधीत दरम्यान प्राप्त पंधराव्या वित्त आयोग निधी मध्ये ग्रामपंचायती च्या कारभाऱ्यांकडून झालेल्या अपहार संदर्भात तसेच ग्रामनिधी व पाणीपुरवठा निधी अंतर्गत बँकेत पैसे जमा न करता परस्पर खर्ची झाले असल्याच्या रावेर यावल आमदार शिरीष मधुकरराव चौधरी तसेच माजी पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांनी केलेल्या तक्रारी वरून ग्रामविस्तार अधिकारी यांचे कडून चौकशी अहवाल प्राप्त झाल्या नंतर ही पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड (बोरसे) यांनी त्यावर काही ही कारवाई केलेली नसल्याने आपले विरुद्ध , महाराष्ट्र नागरी सेवा१९८१ अंतर्गत कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत चा खुलासा चार दिवसाचे आत सादर करावा तसेच प्राप्त अहवालानुसार अपहार व अनियमित्ता असल्यास संबंधितावर जबाबदारी निश्चित करून जबाबदार व्यक्तीवर करावयाच्या कार्यवाहीचा, प्रस्तावा सोबत उपस्थित राहावे आवश्यकता असल्यास तात्काळ राज्य शासनाचे ग्रामविकास विभागाकडील ४ जानेवारी २०१७चे पत्रान्वय कारवाई करावी असा आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांनी येथील यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) यांना दिले आहे.
दरम्यान आज उपोषणाच्या चौथ्या दिवसी देखील पंचायत समितीच्या प्रशासनाकडुन उपोषणकर्ते शेखर पाटील व त्यांचे सहकारी यांच्या मागणी अनुसार ठोस अशी कुठले ही पाऊल न उचलण्यात आल्याने हे आमरण उपोषण सुरू असुन उपोषणकत्यांची प्रकृती खालवली असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांकडून प्राप्त झाली आहे .