मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान किसान योजनेच्या प्रमाणेच आता राज्यात देखील मुख्यमंत्री किसान योजनेच्या माध्यमातून शेतकर्यांना थेट मदत दिली जाणार आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच आपण शेतकर्यांना प्राधान्य देणार असल्याची घोषणा केली आहे. यात विशेष करून शेतकर्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडू नये असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. यानंतर आता राज्य सरकार लवकरच मुख्यमंत्री किसान योजना लागू करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही योजना नेमकी केव्हा लागू होणार याची माहिती मिळालेली नाही. तथापि, पुढील वर्षाच्या प्रारंभीपासून याला अंमलात आणले जाईल असे मानले जात आहे.
मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकर्यांना वर्षाला सहा हजार रुपये अनुदान देण्याचं नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना वर्षाला एकूण केंद्र सरकारचे सहा हजार आणि राज्य सरकारचे सहा हजार असे १२ हजार रुपये मिळू शकणार आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.