चोपडा, प्रतिनिधी | भविष्य काळात मानव विरहित तंत्रज्ञान मानवाचे जीवन व्यापणार आहे. ड्रोन कल्चर आता जग आणि जीवन व्यापणार आहे. शिकण्यासाठी तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी शिक्षण हे तत्त्व आता जगाला पटले आहे. नव्या पिढीकडे आधुनिक तंत्रज्ञान आहे. गॅलेक्सी कॉम्पुटरने चोपडा शहराला नवी ओळख दिली आहे, असे प्रतिपादन माजी विधानसभा अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी केले.
येथील पीपल्स बॅंकेच्या हॉलमध्ये एस.पी. रोबोटिक्स (चेन्नई) व गॅलेक्सी कॉम्प्युटर एज्यूकेशन (चोपडा) आयोजित ‘ड्रोन्स फॉर ज्युनिअर्स लाँचींग सेरेमनी’ प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. सात ते ११ वयोगटातील मुलांसाठी रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करुन दैनंदीन जीवनाला आगळे रूप देण्याचा हा प्रयत्न आहे.
यावेळी मंचावर एस.पी. रोबोटिक्सचे उपाध्यक्ष जानकीरामन, स्वच्छतादूत डॉ. विकास हरताळकर, आनंद वैद्य, राहुल माथूर, पीपल्स बॅंकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, चोपडे एजुकेशन सोसायटीच्या सचिव माधुरी मयुर, भगिनी मंडळाच्या अध्यक्षा पुनम गुजराथी, विकास गुजराथी, गॅलेक्सी कॉम्प्युटरचे नितीन शहा हे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते ड्रोन हवेत उडवून आणि व्हॉइस कंट्रोल कारला चालवून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधतांना एस.पी. रोबोटिक्सचे जानकीरामन म्हणाले की, रोबोटिक्स हा बालक विकासाचा कार्यक्रम आहे. यामुळे मुलांच्या अध्ययन क्षमता वाढतात. मुलांच्या सर्जनक्षमता, बौद्धिकक्षमता, तार्किकक्षमता यामुळे वाढीस लागतात. कृतियुक्त अध्ययनाचे रोबोटिक्स हे उत्तम माध्यम आहे. माधुरी मयुर व अनिल अग्रवाल यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सौ. प्रीती शहा यांनी तर सूत्रसंचालन श्रुती पाटील व अनुश्री पाटील यांनी केले. यावेळी गॅलेक्सी कॉम्प्यूटरचे नितीन शहा यांनी या उपक्रमाची माहिती देत या प्रोग्रामिंगसाठी प्रवेश घेण्याचे आवाहन केले. यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.