जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीन ड मधील अपक्ष उमेदवार ललित विजय नारखेडे यांच्या प्रचाराला आज अधिकृत सुरुवात झाली. खेडी बुद्रुक येथून प्रचाराचा श्रीगणेशा करत त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधण्यावर भर दिला.
खेडी बुद्रुक परिसरातील माऊली नगर तसेच विविध नगर व कॉलनींमधून प्रचार रॅली काढण्यात आली. यानंतर आंबेडकर नगरातही प्रचार दौरा करण्यात आला. रॅलीदरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत केले असून काही ठिकाणी औक्षण करून शुभेच्छा देण्यात आल्या. परिसरात प्रचारादरम्यान उत्साही वातावरण पाहायला मिळाले.

प्रभाग 3 ड मध्ये ललित नारखेडे यांच्या प्रचाराची सुरुवात थेट जनतेशी संवाद साधत आणि स्थानिक प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवत झाली असून पुढील काळात प्रचाराला अधिक गती येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या वेळी अनेक नागरिकांनी आपल्या समस्या थेट उमेदवार ललित नारखेडे यांच्यासमोर मांडल्या. काही रहिवाशांनी सांगितले की, परिसरातील नाल्याचे पाणी पावसाळ्यात थेट घरांमध्ये शिरते, त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी संरक्षण भिंत उभारणे, योग्य गटारी व्यवस्था करणे तसेच अमृत योजनेअंतर्गत नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली.
खेडी बुद्रुक व आंबेडकर नगरातील रहिवाशांनी विकासाच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त करत अपक्ष उमेदवाराकडून ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी केली. ललित नारखेडे यांनीही नागरिकांच्या समस्या गांभीर्याने ऐकून त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.



