मुंबई प्रतिनिधी । भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांनी देखील मंगळवारी (दि.30 जुलै) रोजी रितसर अर्ज दाखल केला आहे.
त्यांनी याआधी अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे या दोन संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला फायनलमध्ये धडक मारण्यात अपयश आले. न्यूझीलंड संघाकडून भारतीय संघाचा पराभव झाला. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नव्या प्रशिक्षकाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. त्यासाठी जाहिरात देऊन अर्ज मागवण्यात आले आहेत. बीसीसीआयने वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कोचिंग स्टाफचा कार्यकाळ वाढवला आहे. भारतीय संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू रॉबिन सिंह यांनी मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज दाखल केला आहे तर प्रवीण आमरे यांनी फलंदाजीच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज दाखल केला आहे.