मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरात श्री संत मुक्ताबाई व श्री संत चांगदेव महाराज यांच्या यात्रोत्सवाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना, नगरपंचायत प्रशासनाची उदासीनता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याने भाविक, वारकरी व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शहरातील अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा प्रवर्तन चौक आजही स्वच्छतागृहांच्या सुविधेपासून वंचित आहे. दरवर्षी या यात्रोत्सवासाठी लाखो वारकरी, महिला भाविक, वृद्ध नागरिक तसेच लहान मुले मुक्ताईनगरमध्ये दाखल होतात. मात्र, एवढ्या मोठ्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या नगरपंचायत प्रशासनाला स्वच्छतागृहासारखी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणेही जमत नसल्याचे चित्र आहे.

प्रवर्तन चौक हा मुक्ताईनगर शहराचा केंद्रबिंदू असून येथे दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असते. दुकाने, व्यवसाय, वाहतूक आणि धार्मिक कार्यक्रम यामुळे हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. असे असतानाही महिला व पुरुष नागरिकांना स्वच्छतागृहासाठी दूरवर जावे लागते, परिणामी महिलांची विशेषतः मोठी कुचंबणा होत असून आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची भीती निर्माण झाली आहे.
या गंभीर समस्येबाबत यापूर्वी अनेकदा प्रसारमाध्यमांतून आवाज उठवण्यात आला. मात्र, त्यानंतरही नगरपंचायत प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसून येते. यात्रोत्सव अगदी तोंडावर येऊन ठेपला असतानाही कोणतेही ठोस नियोजन, तातडीची उपाययोजना किंवा कामाची सुरुवात झालेली नाही, हे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे उदाहरण मानले जात आहे.
यात्रोत्सवाच्या काळात वारकऱ्यांचे हाल झाले, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला किंवा महिलांना गैरसोयींचा सामना करावा लागला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. नगरपंचायत प्रशासन केवळ औपचारिक तयारी दाखवत असून, प्रत्यक्षात मूलभूत सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.



