स्टेट बँकच्या चुकीमुळे लाखो ग्राहकांच्या बँक खात्यासह महत्त्वाची माहिती लीक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चुकीमुळे हजारो ग्राहकांची माहिती लिक झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एसबीआयने ग्राहकांची महत्त्वाची माहिती असणाऱ्या सर्व्हरला कोणत्याही सुरक्षेविना ठेवल्यामुळे या सर्व्हरमध्ये हजारो ग्राहकांची महत्त्वाची माहिती होती जी लीक झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बँकेच्या या चुकीमुळे हजारो ग्राहकांचे बँक बॅलेन्स, खाते क्रमांक याच्यासह काही महत्त्वाची माहिती लीक झाल्याचा संशय आहे. या घटनेमुळे ग्राहकांची चिंता वाढली आहे.

टेकक्रंचच्या एका रिपोर्टनुसार, बँक सर्व्हरला पासवर्ड ठेवण्यात आला नव्हता. त्यामुळे अशा परिस्थितीत कोणीही बँकेचा महत्त्वाचा डेटा अ‍ॅक्सेस करु शकत होते. तसेच ज्यांना सर्व्हरमधून ग्राहकांची माहिती कशी मिळवली जाते याची कल्पना आहे त्यांनी याचा गैरवापर केल्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, सुरक्षा नसलेला हा सर्व्हर हा बँकेच्या SBI Quick सेवेचा भाग होता. यावरुन ग्राहक सामान्य माहिती मिळवण्यासाठी मेसेज किंवा मिस कॉल देऊन ती माहिती मिळवू शकतात. बँकेने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, SBI Quick – MISSED CALL BANKING ही मोफत सेवा असून तुम्ही तुमचा बॅलेन्स, मिनी स्टेटमेंट आणि इतर माहिती आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन एसएमएस किंवा मिस कॉल देऊन मिळवू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील मोठी बँक असून लाखो ग्राहकांचे त्यामध्ये खाते आहे. त्यामुळे अशाप्रकारचे रिपोर्ट समोर आल्यानंतर बँकेतील खात्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दरम्यान,सर्व्हर किती वेळासाठी सुरक्षेविना होता याची माहिती मिळू शकली नाही. मात्र टेकक्रंचने याबाबत एसबीआयशी संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी याप्रकरणी कोणतीही माहिती दिलेली नाही.

Add Comment

Protected Content