
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील मेहरुण परिसरातील शिवाजी महाराज उद्यानाजवळ असलेल्या स्मशानभूमीची दयनीय अवस्था पाहता आगामी महापालिका अर्थसंकल्पात तिच्या सुशोभीकरणासाठी किमान पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवकांनी केली आहे. या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मेहरुण परिसरातील शिवाजी महाराज उद्यानालगत असलेली ही स्मशानभूमी अनेक वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत आहे. शहरातील विस्तारित भागातील तांबापूर, इच्छादेवी, आदर्शनगर, महाबळ कॉलनी, सुप्रिम कॉलनी, रामेश्वर कॉलनी तसेच इतर परिसरातील नागरिक अंत्यसंस्कारासाठी या ठिकाणी येतात. मात्र, येथे आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
अंत्यसंस्कारासाठी तयार करण्यात आलेले ओटे अपुरे असून त्यावरील लोखंडी पिंजरेही मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहेत. या पिंजर्यांच्या सहाय्याने चिता रचली जाते, मात्र ते सुरक्षित नसल्याने अंत्यसंस्कार करताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे ओट्यांची संख्या वाढविणे आणि विद्यमान पिंजर्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अंधार असतो. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर पथदिव्यांची संख्या वाढवून अधिक प्रकाशमान दिवे बसविण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण स्मशानभूमीभोवती कंपाऊंड वॉल उभारून सुरक्षेची व्यवस्था करावी आणि येण्या-जाण्यासाठी योग्य गेट बसवावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
स्मशानभूमीत येणाऱ्या नागरिकांसाठी बसण्याची योग्य व्यवस्था नसल्यामुळे विशेषतः पावसाळ्यात मोठ्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे किमान हजार नागरिक बसू शकतील अशी मोठ्या शेडची व्यवस्था करावी, तसेच बसण्यासाठी बाकडे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी आवश्यक असलेले गोवऱ्या आणि लाकडाची व्यवस्था महापालिका निधीतून करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय महादेव मंदिराकडून जाणारा जुना वहिवाट रस्ता काँक्रिटीकरण करून त्यावर पथदिव्यांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून नागरिकांना सुरक्षितपणे स्मशानभूमीत ये-जा करता येईल, अशीही सूचना करण्यात आली आहे.
मेहरुण स्मशानभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी आर्थिक वर्षाच्या महापालिका बजेटमध्ये पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक सुनिल भैय्या माळी आणि माजी नगरसेवक राजू मोरे यांनी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास महापालिका कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.



