मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आदिशक्ती मुक्ताई व योगिराज चांगदेव महाराज यांच्या गुरूशिष्य भेटीच्या पर्वावर माघवारी महाशिवरात्र यात्रौत्सवाचे ध्वजपूजन प्रांताधिकारी जितेंद्र पाटील व आ. चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे मुक्ताईनगरीत आजपासून वारकऱ्यांचा कुंभमेळा भरणार आहे.
माघ महिन्यात महाशिवरात्री पर्वावर गुरू संत मुक्ताबाई व शिष्य चांगदेव महाराज यांच्या अनुग्रह दिनाच्या पर्वावर परंपरेने शेकडो दिंड्या पालख्यांसह लाखो वारकरी वारीस येतात. मुक्ताबाई समाधीस्थळी मूळ मंदिर कोथळी येथे यात्रोत्सवाचे ध्वजपूजन उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील व आ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार गिरीश वखारे, संत मुक्ताई संस्थान अध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील, विश्वस्त सम्राट पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख हभप रवींद्र महाराज हरणे, मुक्ताई मंदिर व्यवस्थापक उद्धव महाराज जुनारे, हभप पंकज महाराज पाटील, छोटू भोई, पंकज राणे, पंकज कोळी, गणेश टोंगे, ज्ञानेश्वर हरणे, गणेश आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.
पहिल्यांदाच यात्रौत्सवाचे सूक्ष्म नियोजन
जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी चांगदेव मुक्ताई यात्रेकरिता उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नियुक्ती केली आहे. यात्रौत्सवाचे नियोजनाकरिता ११ विभागाचे शासकीय अधिकारी कर्मचारी व मंदिर विश्वस्त व्यवस्थापक यांनी करावयाच्या कामाची जबाबदारी दिली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सूक्ष्म नियोजनातून यावर्षीचा यात्रौत्सव पार पडणार आहे.
SDRF चे जवान तैनात
जुने मुक्ताई मंदिर कोथळी व चांगदेव मंदिर येथे SDRF चे पथक ३७ जवानांसह प्रथमच दाखल झाले आहे. अग्निशमन वाहन, रुग्णवाहिका सज्ज आहे. मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यात्रोत्सवाचे ध्वजपूजन झाले होते. तर यंदाचे यात्रोत्सवाचे नियोजन आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी जिल्हा प्रशासनाने आपल्या हातात घेतल्याने विविध सुविधा तसेच सुरक्षित यात्रोत्सव पार पडणार असल्याने वारकरी व भाविकांतर्फे समाधान व्यक्त होत आहे.
संत मुक्ताई – चांगदेव विजया एकादशी व महाशिवरात्री माघवारी यात्रोत्सव
२२ ते २७ फेब्रुवारी २०२५ या काळात पार पडणार असून जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर ही भूमी संत मुक्ताई साहेबांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली भूमी आहे. त्यातच चांगदेव येथे योगीराज चांगदेव महाराज यांची तपोभूमी असल्याने महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील अनेक जिल्ह्यातून वारकरी व भाविक मोठ्या संख्येने पायी दिंडी सोहळे तसेच दळणवळणाच्या अनेक साधनांनी दर्शनासाठी तसेच भक्तीचा जागर करण्यासाठी मुक्ताई चरणी लीन होत असतात. संत मुक्ताई साहेबांच्या दर्शनासाठी कोथळी, मेहुण तसेच मुक्ताईनगर शहरातील संत मुक्ताई मंदिरांवर लाखोंच्या संख्येने तसेच चांगदेव येथे योगीराज चांगदेव महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी होत असते. संत दर्शन, भजन संध्या, महाआरती यासह टाळ मृदुंगाच्या गजरात संत भूमी मुक्ताई नगरी दुमदुमणार आहे.