नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उन्नाव बलात्कारातील मुख्य आरोपी आमदार कुलदीप सिंह सेंगर यांची भाजपाने पक्षातून हकालपट्टी केली आहे. कुलदीप सिंह सेंगर यांना पक्षातून काढून टाकावे यासाठी भाजपा पक्षावर मोठ्या प्रमाणात दबाव होता. उन्नाव बलात्कार पीडितेच्या अपघातानंतर हा दबाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. अखेर भाजपाने कारवाई करत कुलदीप सिंह सेंगर यांना पक्षातून काढून टाकले आहे.
उन्नाव खटला उत्तर प्रदेश राज्याबाहेर चालवण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने आज दिले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भाजपने काही तासांच्या आत कुलदीप सिंह सेंगरची पक्षातून हकालपट्टी केली आहे. आरोपी कुलदीपला भाजपचा पाठिंबा मिळत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. परंतु, विरोधकांच्या आरोपानंतर कुलदीप सिंह सेंगरला पक्षातून दोन वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी म्हटले होते. पण त्यानंतर सेंगरच्या पत्नीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने विरोधकांनी भाजपला चांगलेच धारेवर धरले होते. दरम्यान, उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित मुलगी रविवारी रायबरेलीच्या अतरेली गावानजीक झालेल्या भीषण अपघातात गंभीररित्या जखमी झाली होती. या अपघातात पीडित तरुणीची काकी आणि मावशीचा जागीच मृत्यू झाला. तर वकील महेंद्र सिंह हेदेखील गंभीर जखमी झाले होते.