शिवसेना-उबाठा जिल्हाप्रमुखपदी कुलभूषण पाटील !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांवर शिक्कामोर्तब करत शिवसेना-उबाठा पक्षाने जिल्हाप्रमुखपदी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील ( Kulbhushan PAtil Jalgaon ) यांची नियुक्ती जाहीर केली आहे.

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातून एकही जागा जिंकता आली नाही. यातच ऐन मतदानाच्या आधीच जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केल्याने मोठी खळबळ उडाली होती. यातच जळगावातून कुलभूषण पाटील तर एरंडोल-पारोळ्यातून डॉ. हर्षल माने यांनी बंडखोरी करत उमेदवारी केल्याने पक्षाने त्यांची हकालपट्टी केली होती. आता जळगाव महापालिकेसह नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार असल्याने शिवसेना-उबाठा पक्षाच्या वतीने ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या अनुषंगाने जिल्हाप्रमुखपदी कुलभूषण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यासोबत, जिल्हा संघटकपदी पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना-उबाठाचे लोकसभेचे उमेदवार करण पवार यांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर माजी खासदार उन्मेष पाटील यांना देखील लवकरच मोठे पद मिळण्याची शक्यता आहे. त्यांची नियुक्ती देखील लवकरच जाहीर होऊ शकते. या पदाधिकाऱ्यांवर आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्याची जबाबदारी राहणार आहे.

कुलभूषण पाटील यांनी उपमहापौर असतांना भरीव कामे केली असून पक्षाच्या प्रचार-प्रसारासाठी प्रयत्न देखील केले आहेत. त्यांनी बंडखोरी करून विधानसभा निवडणूक लढविली. यात त्यांना यश आले नसले तरी देखील त्यांनी जनसंपर्क कायम राखला असून याचेच फळ त्यांना पक्षाने जिल्हाप्रमुखपदाच्या माध्यमातुन दिल्याचे मानले जात आहे. तसेच त्यांच्या माध्यमातून पक्षाने तरूण व मराठा समाजाचा चेहरा दिला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्हाप्रमुखपदासाठी स्पर्धेत असलेल्या नेत्यांचा अपेक्षाभंग झाला असून याचे पडसाद देखील उमटण्याची शक्यता आहे.

Protected Content