जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महिलांचे हक्क, अधिकार आणि त्यांची सुरक्षा यासाठी समाजात जाणीव निर्माण होणे आवश्यक असून, त्यासाठी असलेल्या कायद्यांची माहिती प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे. महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कायदेशीर पातळीवर लढण्यासाठी महिलांनी सजग राहावे आणि उपलब्ध असलेल्या कायद्यांचा योग्य उपयोग करावा, असे प्रतिपादन ॲड. महेश भोकरीकर यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “महिलांचे हक्क व सुरक्षा” या विषयावर आधारित व्याख्यानाचे आयोजन विद्यापीठातील अधिसभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमात ॲड. भोकरीकर यांनी महिलांसाठी असलेल्या विविध कायद्यांविषयी सविस्तर माहिती दिली. पॉक्सो कायदा, ‘इन कॅमेरा’ चौकशी, भरपाई देण्याच्या तरतुदी, महिलांचे मूलभूत हक्क आणि अत्याचाराच्या खटल्यांचा जलद निपटारा यासारख्या मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील होते. त्यांच्यासह मंचावर सहायक लोक अभिरक्षक ॲड. शिल्पा रावेरकर, ॲड. श्रेया चौरसिया, अधिसभा सदस्य व मुलींच्या वसतिगृहाच्या अधीक्षिका प्रा. किर्ती कमळजा उपस्थित होत्या. ॲड. रावेरकर यांनी आपल्या भाषणातून विनामूल्य विधीसेवा, सल्ला व कायदेशीर सहाय्य मिळविण्याच्या तरतुदी समजावून सांगितल्या. त्यांनी विधी सेवा प्राधिकरणाच्या १५१०० या टोल फ्री क्रमांकावरील सेवेबाबतही सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले की, समाजव्यवस्था अशी असावी की महिलांवर अत्याचार घडूच नयेत आणि त्यांना न्याय मिळवण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठवण्याची वेळच येऊ नये. महिलांबाबत असलेल्या कायद्यांचे आज योग्य मार्गदर्शन झाले असून उपस्थित विद्यार्थिनींनी हे ज्ञान आत्मसात करून गरजूंपर्यंत पोहोचवावे, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कक्षाधिकारी प्रवीण चंदनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. किर्ती कमळजा यांनी केले. विद्यापीठ प्रशाळेतील विद्यार्थिनींची मोठी उपस्थिती या कार्यक्रमात पाहायला मिळाली.
या व्याख्यानाच्या माध्यमातून महिलांच्या हक्क-सुरक्षेविषयी जागरूकता वाढवण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. कायद्यांचे ज्ञान हे प्रत्येक महिलेने आत्मसात करणे आवश्यक आहे, हे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.



