
मुंबई – बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरुख खान केवळ त्याच्या अभिनयासाठीच नव्हे, तर त्याच्या शिस्तबद्ध जीवनशैलीसाठीही ओळखला जातो. त्याची यशस्वी कारकीर्द आणि कायमस्वरूपी स्टारडम यामागे आहे त्याचा वेळेचा अचूक वापर, फिटनेससाठीचं समर्पण आणि कुटुंबासोबतचा बॅलन्स. शाहरुख खानच्या दैनंदिन आयुष्यातील अनेक पैलू हे प्रेरणादायी आहेत. चला, जाणून घेऊया शाहरुख खानच्या फिटनेसपासून ते बाथरूममधील खास टाइमपासपर्यंतचा दिनक्रम!

शाहरुख खान दिवसातून केवळ तीन ते चार तास झोपतो. त्याच्या मते जास्त झोप म्हणजे आयुष्य वाया घालवणं. तो पहाटे पाच वाजता झोपतो आणि सकाळी नऊ किंवा दहा वाजता उठतो. इतकी कमी झोप असूनही त्याच्यात असलेली ऊर्जा, उत्साह आणि कामासाठीची तयारी पाहून चाहत्यांनाही थक्क व्हायला होतं. शाहरुख स्वतः सांगतो की, त्याच्या कामावर आणि चाहत्यांच्या प्रेमावर आधारित ऊर्जा त्याला कमी झोप असूनही टिकवून ठेवता येते.
आहाराच्या बाबतीत शाहरुख अत्यंत काटेकोर आहे. तो दिवसातून फक्त दोन वेळा जेवतो — दुपारी आणि रात्री. त्याच्या आहारात स्प्राऊट्स, ग्रिल्ड चिकन, ब्रोकोली, सूप, कोशिंबीर आणि डाळ यांचा समावेश असतो. तो साखर, तांदूळ, ब्रेड, बेकरीचे पदार्थ आणि दारू पूर्णपणे टाळतो. या सगळ्याचा परिणाम म्हणजे त्याचं चांगलं शरीरसौष्ठव आणि तंदुरुस्त मानसिकता.
शाहरुखचा व्यायाम सत्रही इतरांपेक्षा वेगळं आहे. रात्री उशिरा, बहुतेक सगळं जग झोपलेलं असताना, तो १०० पुशअप्स, ६० पुलअप्स, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओचा जबरदस्त सेशन घेतो. सत्रानंतर प्रोटीन शेक घेऊन तो फिटनेसचा संपूर्ण सत्र पूर्ण करतो. व्यायाम हा त्याच्यासाठी फक्त शरीर फिट ठेवण्यासाठी नसून, मानसिक ऊर्जा मिळवण्यासाठीही एक महत्त्वाचं साधन आहे.
रात्री काम करणं हा शाहरुखचा विशेष आवडता टाईम आहे. तो सांगतो की, शांत रात्री कल्पनाशक्ती अधिक प्रभावी होते. स्क्रिप्ट्स वाचणं, रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या प्रोजेक्ट्सवर काम करणं, किंवा आगामी चित्रपटांबाबत चर्चा करणं, हे सगळं तो रात्रीच करतो. त्याचं मत आहे की, याच वेळी खऱ्या अर्थानं सर्जनशीलतेला वाव मिळतो.
शाहरुखचा बाथरूम हा केवळ अंघोळीची जागा नसून त्याचा रिलॅक्स झोन आहे. मन्नतमधील त्याच्या बाथरूममध्ये टीव्ही, म्युझिक सेटअप आणि फोनसह अनेक गोष्टी आहेत. तो इथे २ ते ३ तास आरामात घालवतो आणि हा वेळ स्वतःसाठी वापरतो. हीच जागा त्याच्या विचारमंथनासाठी आणि मानसिक ताजेतवानेपणासाठी आदर्श आहे.
कुटुंबाचं महत्त्व शाहरुखला नेहमीच जाणवतं. त्याचे मुलं आर्यन, सुहाना आणि अबराम यांच्यासोबत वेळ घालवणं, पत्नी गौरीसोबत चर्चासत्रं, घरच्यांसोबत चित्रपट पाहणं, गप्पा मारणं या सगळ्या गोष्टी तो मनापासून करतो. काम आणि प्रसिद्धीच्या गडद झगमगाटातही तो कुटुंबाशी नातं जपतो.
शाहरुख यशाबद्दल सांगतो, “यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही. मेहनत, सकारात्मक दृष्टिकोन आणि सतत पुढे जाण्याची इच्छाशक्ती हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे.” तो कधीच थकत नाही, सतत नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो आणि एक सुपरस्टार असूनही साधेपणात समाधान मानतो.



