अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खाजगी ट्रॅव्हल चालवण्यासाठी दर महिन्याला पैसे देण्याच्या मागणीला नकार दिल्याने एका तरुणाला २ जणांनी दुचाकीवर येऊन चाकूने वार करून जीवघेणा हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार अमळनेर शहरातील महाराष्ट्र बेकरी जवळ घडला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जयवंत महेश पाटील हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ट्रॅव्हल्स चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान रविवारी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता जयवंत पाटील हा त्याचा मित्रांसोबत उभे होते. त्यावेळी त्याठिकाणीसंशयित आरोपी शुभम उर्फ शिवम मनोज देशमुख आणि रितेश मनोज देशमुख दोन्ही रा. संविधान चौक अमळनेर हे जयवंत पाटील यांच्याकडे आले. त्यांना दमबाजी करत “तुला ट्रॅव्हल चालवायची असेल तर दर महिन्याला आम्हाला पैसे द्यावे लागतील” अशी मागणी केली.
त्यावर जयवंत पाटील यांनी पैसे देण्यास नकार दिला. या रागातून दोघांनी हातातील चाकू काढून जयवंत पाटील यांच्यावर वार करून जखमी केले. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. जखमी झालेल्या जयवंत पाटील यांना तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान या घटनेबाबत सोमवारी १९ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १.३० वाजता तक्रार देण्यात आली. त्यानुसार संशयित आरोपी शुभम उर्फ शिवम मनोज देशमुख आणि रितेश मनोज देशमुख या दोघांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अजित सावळे करीत आहे.