जळगाव प्रतिनिधी । केंद्र शासनामार्फत देशातील 18 ते 40 वर्षे वयोगटातील अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना (पी.एम.के.एम.वाय) सुरु केली आहे. या योजनेतंर्गत दरमहा 55 रुपये भरल्यास शेतकऱ्यांना 60 वर्षे वयानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
या योजनेसाठी भुअभिलेखानुसार ज्या शेतकऱ्यांच्या नावे 2 हेक्टरपर्यंत लागवडीलायक क्षेत्र आहे, असे शेतकरी पात्र आहेत. ही योजना ऐच्छिक व अशंदायी पेन्शन योजना आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या 1 ऑगस्ट, 2019 रोजीच्या वयानुसार रक्कम रुपये 55/ऱ् ते दोनशे रुपये याप्रमाणे वयाच्या 60 वर्षापर्यंत मासिक हप्ता भरावयाचा आहे. शेतकऱ्ऱ्यांच्या मासिक हप्त्याइतकीच रक्कम केंद्र शासन पेन्शन फंडामध्ये भरणार आहे. या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना 60 वर्षे वयानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.
या योजनेतंर्गत शेतकऱ्यांनी सामाईक सुविधा केंद्रामार्फत (CSC) http//www.pmkmy.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. केंद्र शासनाकडून लाभार्थी नोंदणी फी रक्कम रुपये 30/- सामाईक सुविधा केंद्रास अदा करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांकडून कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. नोंदणीसाठी लाभार्थी शेतकरी यांनी आधारकार्ड, बॅक पासबुक, मोबाईल नंबर इत्यादी सामाईक सुविधा केंद्रात घेऊन जाणे आवश्यक आहे.
या योजनेतंर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी सहभागी व्हावे याकरीता आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांची बैठक घेऊन 31 ऑगस्टपूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नोंदणी करुन घेण्याच्या सूचना दिल्यात. तसेच या योजनेत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे.