मुंबई प्रतिनिधी । राज्यात तृतीयपंथियांच्या कल्याणासाठी किन्नर बोर्ड स्थापन करण्यात येणार असून आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेऊन याचे निर्देश दिले.
खासदार सुप्रिया सुळेंनी आज तृतीयपंथीयांसमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. याप्रसंगी किन्नर बोर्ड स्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच अजित पवार यांना या मागणीचे निवेदनदेखील देण्यात आले आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी या बोर्डाला अनुकुलता दर्शविली असून उपमुख्यमंत्र्यांनी या कामाला गती देण्याची मागणी या पत्रकात देण्यात आली आहे. यानंतर सुप्रीया सुळे यांनी ट्विट करून याबाबतची माहिती जाहीर केली आहे. त्यांनी धनंजय मुंडे, आणि राज्यमंत्री राजेश टोपे यांना आपल्या ट्विटरमध्ये टॅग करून लवकरात लवकर तृतियपंथीयांच्या कल्याणासाठी किन्नर बोर्ड सुरू करा, असे आवाहन केलं. तसेच, सर्वांना समान न्याय हक्क यासाठी आपण ठामपणे उभे राहिले पाहिजे, असेही सुप्रिया यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी लागलीच बैठक घेऊन हे महामंडळ स्थापन करण्याचे तातडीने निर्देश दिले.
तृतीयपंथीयांसाठी कल्याण मंडळ २० दिवसात स्थापण्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks दादा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. खा. @supriya_sule ताई गेली अनेक वर्षे तृतीयपंथीय तसेच वंचित महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या चळवळीला बळ देत आहेत.त्यांच्याच पुढाकाराने आजची बैठक झाली. pic.twitter.com/6lrT6s188m
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 7, 2020