यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव परिसरात शिक्षण देणाऱ्या इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या शाळेतील इ. ७ वीमध्ये शिकणाऱ्या दुर्वेश दिगंबर पाटील आणि निकेश विजय कोळी यांची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी, तर खुशांत ज्ञानेश्वर चांदणे याची बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
तालुकास्तरावरील स्पर्धांमध्ये १४, १७ व १९ वयोगटातील विविध विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यामध्ये दत्त हायस्कूल चिखली येथे झालेल्या कॅरम स्पर्धेत दुर्वेश पाटील आणि निकेश कोळी यांनी उत्कृष्ट खेळ कौशल्य दाखवत आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. याच शिस्त आणि तंत्राचा वापर करत बुद्धिबळ स्पर्धेत खुशांत चांदणे यानेही आपले कौशल्य सिद्ध करत जिल्हास्तरीय स्तरावर प्रवेश मिळवला. या विद्यार्थ्यांनी आपल्या शांत संयमित खेळाने आणि एकाग्रतेने शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही नाव मिळवले आहे.

या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन व श्रीसंत तुकाराम महाराज सेवाभावी संस्था पंढरपूरचे अध्यक्ष विजयकुमार देवचंद पाटील, सचिव व संजीवन हॉस्पिटल डेक्कन, पुणेचे संचालक मनिष विजयकुमार पाटील, तसेच स्व. चेतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संचालिका सौ. पूनम मनिष पाटील यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. शाळेचे मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील, उपमुख्याध्यापक सुहास भालेराव, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
या निवडीमुळे डोणगाव किनगाव रोडवरील इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलचे नाव तालुक्याच्या क्रीडा नकाशावर अधोरेखित झाले असून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.



