जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । किडनी आजारांविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जळगावात गुरुवारी किडनी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. आरोग्यदीप किडनी फाउंडेशन, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रॅलीला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
१२ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीचा शुभारंभ शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालय परिसरातून करण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. या वेळी सिव्हिल सर्जन डॉ. स्वप्निल सांगळे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे, सचिव डॉ. भरत बोरोले यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी आणि आयएमएचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रॅलीदरम्यान सहभागी नागरिकांनी किडनीचे आरोग्य जपण्याबाबत विविध संदेश देणारे फलक आणि घोषवाक्यांच्या माध्यमातून जनजागृती केली. योग्य आहार, नियमित आरोग्य तपासणी, पुरेसे पाणी पिणे आणि मधुमेह व रक्तदाब नियंत्रणात ठेवणे यासारख्या बाबी किडनीच्या आरोग्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालय येथून सुरू झालेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. रॅलीदरम्यान आरोग्यविषयक संदेश देत नागरिकांना किडनी आजारांविषयी जागरूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी यात उत्साहाने सहभाग घेतला.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, बदलती जीवनशैली, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांमुळे किडनी विकारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे वेळेवर तपासणी आणि योग्य जीवनशैली अंगीकारणे अत्यंत गरजेचे असल्याचे यावेळी उपस्थित डॉक्टरांनी सांगितले.
या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांमध्ये किडनी आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली. आरोग्य क्षेत्रातील विविध संस्था एकत्र येऊन राबवलेल्या या रॅलीला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचेही आयोजकांनी नमूद केले.



