धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव-धरणगाव-अमळनेर मार्गे नवसारी, अंकलेश्वर आणि नाशिककडे जाणाऱ्या बसेस जळगाव डेपोच्या आडमुठेपणामुळे अनेकदा एरंडोल मार्गे वळवण्यात येत असल्याच्या आणि उशिरा येत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून येत आहेत. यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, खान्देश प्रवासी असोसिएशनने या संदर्भात पालकमंत्री ना. श्री. गुलाबरावजी पाटील साहेब यांना निवेदन दिले आहे. या बसेस धरणगाव मार्गे नियमित वेळेवर सुरू ठेवण्याची मागणी असोसिएशनने केली आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे आणि खान्देश प्रवासी असोसिएशनच्या विनंतीनुसार जळगाव-धरणगाव-अमळनेर-धुळे-साक्री-नवसारी (सकाळी १०.२० वा.), जळगाव-धरणगाव-अमळनेर-अंकलेश्वर (सकाळी ९.४५ वा.) आणि जळगाव-धरणगाव-धुळे-नाशिक (सकाळी १०.३० वा.) या बससेवा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, जळगाव डेपोच्या हलगर्जीपणामुळे या बसेस बऱ्याचदा एरंडोल मार्गे परस्पर वळवण्यात येतात. तसेच, अनेकदा दोन ते तीन तास उशिराने आणि अनियमितपणे येतात, अशी प्रवाशांची तक्रार आहे.

प्रवाशांनी जळगाव डेपोशी संपर्क साधल्यास त्यांना योग्य आणि अचूक माहिती दिली जात नाही. त्यामुळे प्रवाशांना बसची वाट पाहत एक, दोन किंवा तीन तास ताटकळत उभे राहावे लागते. यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया जातो, शिवाय मनस्ताप होतो.
या गंभीर समस्या लक्षात घेता, खान्देश प्रवासी असोसिएशनचे अध्यक्ष कमलेश तिवारी, उपाध्यक्ष चंद्रकांत भावसार, सचिव श्रेयन्स जैन, सहसचिव अॅड. नंदन पाटील, खजिनदार प्रतीक जैन आणि मार्गदर्शक सदस्य दिनेश पाटील, युवराज रायपूरकर, प्रशांत भाटिया, नारायण महाजन, संभाजी सोनवणे, जतिन नगरिया यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पत्राद्वारे निवेदन दिले आहे. जळगाव-नवसारी, अंकलेश्वर, नाशिक या बससेवा धरणगाव मार्गे कायमस्वरूपी नियमित वेळेवर सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे.



