जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । खान्देशातील सांस्कृतिक परंपरेचा अभिमान ठरलेल्या आणि लोकोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकराव्या बहिणाबाई महोत्सवाचे आज सागर पार्क येथे दिमाखात उद्घाटन झाले. भरारी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित या महोत्सवाच्या उद्घाटनाने संपूर्ण परिसरात उत्साह, लोककलेचा गंध आणि सांस्कृतिक जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.

या महोत्सवाचे उद्घाटन आमदार राजू मामा भोळे, खासदार स्मिताताई वाघ, केड्राईचे राज्य उपाध्यक्ष अनिशभाई शहा, उद्योजक रजनीकांत कोठारी, मनीष जैन आणि पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे उद्घाटन सोहळ्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले असून खान्देशी लोकसंस्कृतीला नवसंजीवनी देणारा हा क्षण ठरला.

महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘ना. बहिणाबाई जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. यामध्ये निळकंठ गायकवाड आणि पुखराज पगारिया यांना सन्मानित करण्यात आले. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मानसी गगडाणी यांना बहिणाबाई पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कारप्राप्त मान्यवरांना मानपत्र, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी व्यासपीठावर संगीता पाटील, दीपक सूर्यवंशी, अनिकेत पाटील, उद्योजक श्रीराम पाटील यांच्यासह नवनिर्माणचे नगरसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक परदेशी यांनी केले, तर सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी प्रभावीपणे केले. उद्घाटन समारंभाचा समारोप ‘वंदे मातरम’ या प्रेरणादायी कार्यक्रमाने करण्यात आला.
खान्देशातील कला, संस्कृती, साहित्य आणि सामाजिक जाणिवांचे दर्शन घडवणारा बहिणाबाई महोत्सव पुढील काही दिवस विविध कार्यक्रमांनी रंगणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



