मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साक्री येथे दोन अल्पवयीन मुलींना विहिरीत ढकलून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या धक्कादायक घटनेचे पडसाद आता राज्याच्या विधानपरिषद सभागृहात उमटले आहेत. या गंभीर घटनेबाबत आमदार एकनाथराव खडसे यांनी सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित करून सरकारला जाब विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासाची स्थिती आणि आरोपींवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती सभागृहाला दिली.
२८ जानेवारी २०२६ रोजी साक्री येथे दोन निष्पाप अल्पवयीन मुलींना विहिरीत ढकलून त्यांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करत शासनाने नेमकी कोणती कारवाई केली आहे, असा सवाल उपस्थित केला. तसेच या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली का, पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कोणती पावले उचलत आहे, याबाबतही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. ग्रामीण भागात मुलींच्या सुरक्षेसाठी पोलीस गस्त वाढविणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचीही मागणी त्यांनी सभागृहात केली.

या प्रश्नाला लेखी उत्तर देताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, घटनेची गंभीर दखल घेत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०३ (२), १३७ (२), ७८, ३(५) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) अधिनियम कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान या गुन्ह्यातील दोन्ही आरोपी हे ‘विधी संघर्षित बालक’ म्हणजेच अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांची ओळख पटवून त्यांना २८ जानेवारी २०२६ रोजीच ताब्यात घेण्यात आले असून त्यांची रवानगी जळगाव येथील बालनिरीक्षण गृहात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगताना गृहमंत्री पुढे म्हणाले की, राज्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ‘निर्भया पथक’ तसेच ‘पोलीस काका–पोलीस दीदी’ यांसारखे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. तसेच सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिला मदत कक्ष स्थापन करण्यात आले असून पीडित महिला व बालकांना मानसिक आणि आर्थिक आधार देण्यासाठी ‘मनोधैर्य योजना’ कार्यान्वित करण्यात आली आहे. १०३, १०९१ आणि ११२ या हेल्पलाईन क्रमांकांद्वारे नागरिकांना चोवीस तास मदत उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केलेल्या या गंभीर प्रश्नामुळे साक्री येथील दुहेरी हत्येचा मुद्दा राज्यस्तरावर चर्चेत आला आहे. या प्रकरणातील खटला जलदगतीने चालवून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले.



