मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाशिवरात्रीच्या दिवशी आमदार एकनाथराव खडसे व रोहिणीताई खडसे यांच्या वतीने संत मुक्ताई आणि योगीराज चांगदेव मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
श्री संत मुक्ताई ह्या खानदेश, विदर्भ, मराठवाडा ,मध्यप्रदेशातील लाखो वारकरी भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. भागवत एकादशी आणि महाशिवरात्रीला या परिसरातून टाळ मृदुंगाच्या गजरात शेकडो मैल पायदळ चालून दिंड्यांसह लाखो भाविक भक्त आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनाला येत असतात.
त्यानिमित्ताने श्री क्षेत्र कोथळी, मुक्ताईनगर, मेहुण आणि चांगदेव येथे यात्रा उत्सव भरला जातो सध्या यात्रोत्सवाला सुरुवात झालेली असून लाखो भाविक भक्त आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनासाठी मुक्ताईनगर चांगदेव येथे दाखल झालेले आहेत त्यामुळे टाळ मृदुंगाचा गजर आदिशक्ती मुक्ताईचा जयघोष भजन कीर्तनात सर्व परिसर निनादुन गेला आहे.
महाशिवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधुन माजी महसुल मंत्री आ. एकनाथराव खडसे आणि राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या तर्फे आदिशक्ती मुक्ताई आणि योगिराज चांगदेव यांच्या पद स्पर्शाने पावन कोथळी,मेहुण,चांगदेव, मुक्ताईनगर या पावन तिर्थक्षेत्रांवर हेलिकॉप्टर मधुन पुष्पवृष्टी करण्यात आली. रोहिणी खडसे यांनी हेलिकॉप्टर मधून आदिशक्ती मुक्ताई अंतर्धान स्थळ कोथळी ,योगिराज चांगदेव मंदिर चांगदेव , आदिशक्ती मुक्ताई मंदिर मेहुण ,नविन आदिशक्ती मुक्ताई मंदिर मुक्ताईनगर या तिर्थ स्थानांवर पुष्पवृष्टी केली.
या संदर्भात रोहिणी खडसे म्हणाल्या महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आदिशक्ती मुक्ताई अंतर्धान स्थळ श्री क्षेत्र कोथळी, आदिशक्ती मुक्ताई मंदिर श्री क्षेत्र तापीतीर मेहुण, योगिराज चांगदेव मंदिर श्री क्षेत्र चांगदेव, आदिशक्ती मुक्ताई मंदिर श्री क्षेत्र मुक्ताईनगर या पावन तिर्थ स्थानांवर हेलिकॉप्टर मधुन पुष्पवृष्टी करून आदिशक्ती मुक्ताई ,योगिराज चांगदेव यांची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले.
दरम्यान, लक्षावधी भाविकांना हेलिकॉप्टर मधुन पुष्पवृष्टी करताना टाळ मृदुंगाच्या गजरात आदिशक्ती मुक्ताईच्या जयघोषात भक्ती आणि श्रद्धेचा निस्सीम आनंद देणारा भरलेला वैष्णवांचा मेळा याची देही याची डोळा साठवता आला. यात्रोत्सवा निमित्त प्रथमच मुक्ताई, चांगदेव मंदिरावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. उपस्थित वारकरी भाविक भक्तांमध्ये हा नयनरम्य सोहळा कुतूहल आणि औत्सुक्याचा विषय ठरला.