जळगाव, प्रतिनिधी । कोविडचे बरेचसे रुग्ण गृह विलगीकरणात असून त्यांना घरीच ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध व्हावे या दृष्टिने सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने रुग्णांसाठी ७ ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर उपलब्ध करून दिले आहेत. या मशिनचा लोकार्पण सोहळा आज शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता नवी पेठेतील केशवस्मृती प्रतिष्ठानच्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी प्रेम कोगटा, संजय बिर्ला, संजय नारखेडे, डॉ. नितीन चौधरी, डॉ. धर्मेंद्र पाटील, रा.स्व. संघाचे देवगिरी प्रांत प्रचार प्रमुख स्वानंद झारे, प्रांत कार्यकारिणी सदस्य योगेश्वर गर्गे, रत्नाकर पाटील, सचिन चोरडिया, नंदू अडवाणी, शरद कोत्तावार, भानुदास येवलेकर, हेमंत भिडे, सागर येवले उपस्थित होते.
कोरोना काळात अनेक रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यात दिवसात रुग्णालयात बेड न मिळणे, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध न होणे, इंजेक्शनचा तुटवडा आदि समस्या भेडसावत आहे. सदरची मशीन केशवस्मृतीच्या मुख्य कार्यालयात उपलब्ध राहणार असून ज्या रुग्णांना याची गरज भासते आहे त्यांनी रुग्णास ऑक्सिजन ची गरज असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, किती लिटर ऑक्सिजन ची गरज आहे त्याचा तपशील, ज्या रुग्णासाठी हवे आहे त्यांचे आधारकार्ड, पूर्ण पत्ता व इतर आवश्यक तपशील, मशीन नेणाऱ्याचे आधारकार्ड, ओळख असणाऱ्या व्यक्तीचा संपूर्ण तपशील सादर करणे गरजेचे असेल. ऑक्सिजन मशीन ही 5 लिटर क्षमतेची असणार आहेत. रुग्णास लागणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर गरज नसल्याचे चित्र लक्षात आल्यावर हे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर केशवस्मृतीस परत करावयाचे आहे.