नवी दिल्ली (प्रतिनिधी) खासदार रक्षाताई खडसे यांनी मॅटर अंडर अर्जेंट पब्लिक इंपोर्टन्स यु.एस ३७७ च्या अन्वये लोकसभागृहात मागणी केली की, आयुष्यमान भारत योजनेचा लाभ केशरी रेशनकार्ड धारकांनासुद्धा मिळावा जेणेकरून या योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना याचा फायदा मिळेल व आपला देश सुदृढ, सशक्त आणि आरोग्यसंपन्न होईल.
या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त खाजगी हॉस्पिटल सहभागी करून घेण्यात यावी आणि डॉक्टर व खासगी हॉस्पिटल यांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी पुरेसा असा मोबदला मिळत नाही जर हा मोबदला योग्य प्रमाणात वाढवला तर स्पेशल ट्रीटमेंट करणारे व जास्तीत जास्त हॉस्पिटल यामध्ये नोंदणीकृत होऊन गरीब व सामान्य रुग्णांना त्याचा लाभ घेता येईल, अशी मागणीही खा. रक्षाताईंनी लोकसभागृहात केली.
रावेर लोकसभा क्षेत्रातील सुमारे साडेचार लाखाहून अधिक रुग्णांना ‘आयुष्यमान भारत’ योजनेचा फायदा मिळाला आहे. पिवळे रेशनकार्डधारक गरिबांसाठी ही योजना एक वरदान ठरत आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यात महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना १ एप्रिल २०१७ पासून कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत पिवळे आणि केशरी या दोन्ही रेशनकार्ड धारकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळत आहे. ‘आयुष्यमान भारत’ या मोदी सरकारच्या क्रांतिकारी योजनेचा लाभ फक्त पिवळ्या रेशनकार्ड धारकांना मिळत असून केशरीकार्ड धारकांना या योजनेच्या फायद्यापासून वंचित रहावे लागत आहे.