यावल-अय्यूब पटेल | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देदीप्यमान इतिहासाने प्रेरीत होऊन केरळमधील एक तरूण सायकलवरून महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची पाहणी करत असून तो यावलमधील किल्ला पाहण्यासाठी आला असता त्याचे प्रशासनातर्फे स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे दैवत व हिन्दवी स्वराज्य संस्थेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजंच्या पराक्रमी इतिहास वाचुन प्रेरित झालेल्या केरळच्या कोत्तापूर जिल्हा कालीकत येथील पराक्रमी शिवभक्त शिवराज गायकवाड ( पुर्वीचे नांव हमरास एमके ) या तरुणाने संपुर्ण राज्यातुन सायकलव्दारे भ्रमण करीत सुमारे १५००० किलोमिटरचा प्रवास करून यावल गाठले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळातील राज्यातील संपुर्ण गढ किल्ले पाहण्याचा त्याचा संकल्प आहे.
शिवराज यांचे यावलमध्ये आगमन झाल्यानंतर तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांनी त्यांचे स्वागत केले. शिवराज गायकवाड याने बिकॉम पर्यंत शिक्षण घेतले असुन, तो सउदी अरब या देशात दुबई येथे वाहनचालकाचे काम करीत असे. नंतर तो आपल्या भारत देशात परतला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मोजकीच माहीती त्याच्याकडे होती. महाराजांचा पराक्रमी इतिहास जाणुन घेण्याची प्रबळ ईच्छाशक्ती घेवुन त्याला हिंदी आणी इंग्रजी भाषा येते म्हणुन समाज माध्यम ( सोशल मिडीया ) च्या माध्यमातुन महाराजांबद्दल संपुर्ण माहिती त्याने जाणून घेतली आणि त्याला त्यातून प्रेरणा मिळाली.
यानंतर महाराष्ट्र राज्यातील संपुर्ण गड- किल्ले पाहण्याचा संकल्प घेत दिनांक १ मे २०२२ रोजी केरळ राज्यातुन प्रवासाला निघालेल्या शिवराज गायकवाड (हमरास एमके ) याचा प्रवास अव्याहतपणे सुरूच आहे. खासदार उदयराजे भोसले यांनी या शिव भक्तास सायकल भेट दिली असल्याचे या तरुणाने सांगीतले. यावल शहरातील निंबाळकर महाराजांचा किल्ला पाहणी करून शिवराज गायकवाड याने महर्षी व्यासांच्या मंदिरात जावुन दर्शन घेतले. दरम्यान यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते ,महसुलचे कर्मचारी सुयोग पाटील, युनुस खान, संतोष पाटील आदींच्या वतीने या पराक्रमी शिवराज गायकवाड शिवभक्ताचे स्वागत सत्कार करण्यात आले .नंतर तो आपल्या पुढील प्रवासासाठी पाल तालुका रावेर कडे रवाना झाला.