रावेर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, सर्व कृषी केंद्र चालकांनी तातडीने आपल्या केंद्रावरचा रासायनिक खतांचा साठा (स्टॉक) पॉश मशीनवर अपडेट ठेवावा, अन्यथा कृषी विभाग कारवाई करणार असल्याचा इशारा दिला जात आहे.
यासंदर्भात पुणे येथे नुकतीच एक तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे कृषी आयुक्त, कृषी संचालक व क्वालिटी कंट्रोलचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्यात नविन रासायनिक खते मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील कोणत्याही कृषी केंद्रावर अतिरिक्त किंवा अनधिकृत साठा आढळल्यास कठोर कारवाईची शक्यता असल्याने कृषी केंद्र चालकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन माफदाचे जिल्हाध्यक्ष विनोद तराळ यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की, “राज्यस्तरावर यंत्रणा सज्ज झाली असून, कोणत्याही केंद्रावर उणीव आढळल्यास परवाना निलंबित होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी POS मशीनवरील स्टॉक अपडेट ठेवणे बंधनकारक आहे.” असे तराळ यांनी म्हटले आहे.



